‘जेएनयू’मध्ये छत्रपती शिवरायांच्या सुरक्षेविषयक धोरणाचा होणार अभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 11:33 IST2025-02-19T11:32:15+5:302025-02-19T11:33:03+5:30
२७ फेब्रुवारी रोजी मराठी अध्यासन आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

‘जेएनयू’मध्ये छत्रपती शिवरायांच्या सुरक्षेविषयक धोरणाचा होणार अभ्यास
श्रीकिशन काळे
पुणे : नवी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यवस्थापनाविषयीचे धडे विद्यार्थ्यांना गिरवता येणार आहेत. त्यासाठी विद्यापीठामध्ये शिवरायांचे अध्यासन सुरू करण्यात येत आहे. त्यामध्ये शिवरायांच्या सुरक्षेविषयी अभ्यास करता येणार आहे.
‘जेएनयू’मध्ये सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन तयार झाले आहे. गेल्या काही वर्षांमधील घेतलेल्या प्रयत्नांना यश आले. विशेष म्हणजे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी एक कोटी रुपयांचा निधी जेएनयूला दिला होता. मात्र, तेव्हा हे अध्यासन सुरू होऊ शकले नाही. ‘जेएनयू’ मध्ये सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात होते. अखेर त्याला यश आले आहे.
नवी दिल्ली येथील जेएनयूमध्ये, ‘छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन’ केंद्र उभारण्यासाठी राज्य शासनाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून हा निधी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला वितरीत केला जाणार आहे. काही निधी मिळालेला आहे.
जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, धोरण व राज्यकारभार पद्धती आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करणारे अध्यासन उभारावे, अशी कल्पना तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. दिल्लीत जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडित यांच्यासोबत मुनगंटीवार यांच्या अनेक बैठका झाल्या. या अध्यासनासाठी अभ्यासक्रम आखणे, विषय मांडणीसाठी, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात विविध बाबतीतील संशोधनासाठी राज्य शासनाने जेएनयू सोबत सहकार्य केले आहे.
मराठी भाषेतून अभ्यासक्रम
या अध्यासनात अंतर्गत सुरक्षा, पश्चिम हिंदी महासागरातील मराठा नौदल रणनीती, गनिमी कावा, किल्ल्यांच्या तटबंदी संदर्भातील रणनीती, मराठा इतिहास या विषयावर संशोधनात्मक कार्य होणार आहे. तसेच मराठी भाषेतूनही पदविका, पदवी आणि विद्यावाचस्पती पदवी (पीएच.डी) ची सुविधा तसेच मराठा साम्राजाची सैन्य व्यूहरचना, किल्ले व तटबंदी रचना यावरील अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहेत.
आम्ही २७ फेब्रुवारी रोजी मराठी अध्यासन आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाचे उद्घाटन होईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्घाटनाला येणार आहेत. - शांतीश्री पंडित, कुलगुरू, जेएनयू, नवी दिल्ली