छत्रपती कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार; न्यायालयाच्या निर्णयाने अजित दादांना धक्का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 13:39 IST2023-04-21T13:39:00+5:302023-04-21T13:39:09+5:30
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे

छत्रपती कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार; न्यायालयाच्या निर्णयाने अजित दादांना धक्का?
बारामती : भवानीनगर(ता.इंदापुर) छत्रपती कारखान्याच्या जुन्या मतदार याद्या रद्द करुन पोटनियम आणि कायद्यानुसार नव्याने मतदार याद्या तयार कराव्यात, तसेच येत्या चार आठवड्यात कारखान्याची निवडणुक प्रक्रिया राबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे बाजार समितीपाठोपाठ कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार असल्याचे संकेत आहेत.
शेतकरी कृती समितीने दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेत हे आदेश दिले आहेत. शेतकरी कृती समितीचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी याबाबत ‘लोकमत’शी बोलताना माहिती दिली. कारखान्याच्या पोटनियमाप्रमाणे किमान तीन वर्ष ऊसपुरवठा करणे आवश्यक आहे. यामध्ये तीन वर्ष ऊसपुरवठा न करणाऱ्या सभासदांना मताचा अधिकार देवु नये, यासाठी जाचक यांनी तीन वर्षांपुर्वी याचिका दाखल केली होती. ज्यांनी सलग किमान तीन वर्ष ऊसपुरवठा केलेला नाही. त्यांचा कारखान्याच्या निवडणुकीत मताचा अधिकार रद्द करण्याची मागणी जाचक यांनी केली होती.
त्यावर शुक्रवारी(दि २१) उच्च न्यायालयाची सुनावणी पार पडली. यामध्ये उच्च न्यायालयाने कारखान्याच्या जुन्या मतदार याद्या रद्द करुन पोटनियम आणि कायद्यानुसार नविन मतदार याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच येत्या चार आठवड्यात निवडणुक प्रक्रिया राबविण्याचे आदेश यावेळी देण्यात आल्याचे जाचक यांनी सांगितले. दरम्यान,या निकालावर आपण समाधानी आहोत. छत्रपतीच्या सभासदांच्या सदसदविवेक बुध्दीवर आपला विश्वास असल्याचे जाचक यांनी सांगितले. भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांंचा शब्द कारखान्यात राजकीय समीकरणात अंतिम मानला जातो. उच्च न्यायालयाचा आजचा निकाल हा अजित पवार यांना धक्का मानला जात आहे.