रिक्षाचालकाची मुलगी झाली 'सीए'; प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मिळविले पहिल्याच प्रयत्नात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 19:07 IST2024-12-27T19:06:53+5:302024-12-27T19:07:40+5:30
मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन गरुडभरारी घेणाऱ्या गौरी शिंदे हिनेजिद्दीच्या जोरावर यश मिळविता येते हे दाखवून दिले आहे.

रिक्षाचालकाची मुलगी झाली 'सीए'; प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मिळविले पहिल्याच प्रयत्नात यश
भोर : आर्थिक परिस्थितीवर मात करीत जिद्द व चिकाटी, मेहनतीच्या जोरावर बाजारवाडी (ता. भोर) गौरी मोहन शिंदे ही रिक्षावाल्याची मुलगी सीएचीपरीक्षा उत्तीर्ण झाली. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या गौरीने प्राथमिक शिक्षण - साधना हायस्कूल, मुंबई येथे, दहावीपर्यंतचे - शिवाजी हायस्कूल, भोर येथे आणि पदवी शिक्षण मुंबई येथील एस. के. सोमय्या महाविद्यालयातून घेतले.
गौरी शिंदे हिने सीए होण्याचे स्वप्न अथक प्रयत्नांनी पूर्ण केले. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन गरुडभरारी घेणाऱ्या गौरी शिंदे हिने उराशी बाळगलेल्या स्वप्नाची पूर्ती करून जिद्दीच्या जोरावर यश मिळविता येते हे दाखवून दिले आहे. गौरीचे वडील मोहन शिंदे शेतकरी कुटुंबातील असून, वर्षभरात भात पिकावर गुजराण करणे शक्य नसल्याने वयाच्या १८व्या वर्षी मुंबईची वाट धरली. गौरीचे वडील गेली ३६ वर्षे रिक्षा चालवत आहेत तर आई सुनीता शिंदे ह्या घरगुती खानावळ चालवितात.
“कोणतीही खाजगी शिकवणी न लावता सेल्फ स्टडीवर भर देत नियमित अभ्यास केला. आई-वडील व भावंडांकडून कायमच प्रोत्साहन मिळाले. अधिक परिश्रम घेऊन परीक्षा पासच व्हायचे हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवल्याने यश गाठता आले.”