विचार बदला! भारतीय ब्रँड तयार करा अन् त्याला जागतिक स्तरावर सर्वाेच्च स्थानी घेऊन जा - प्रकाश जावडेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 15:32 IST2025-11-08T15:32:04+5:302025-11-08T15:32:17+5:30
आम्ही आमची संस्था तयार करू आणि तिला टॉप स्थानी घेऊन जाऊ, हा विचार करा

विचार बदला! भारतीय ब्रँड तयार करा अन् त्याला जागतिक स्तरावर सर्वाेच्च स्थानी घेऊन जा - प्रकाश जावडेकर
पुणे: देशातील असंख्य तरुण सीए शिक्षण पूर्ण करतात आणि जागतिक स्तरावर चर्चेत असलेल्या डेलॉइट, ईवाय, केपीएमजी, आरएसएम आदी कंपन्यांमध्ये काम मिळवण्यात धन्यता मानतात. आता हे चित्र बदलले पाहिजे. आम्ही आमची संस्था तयार करू आणि तिला टॉप स्थानी घेऊन जाऊ, हा विचार करा. भारतीय ब्रँड तयार करा आणि तिला जागतिक स्तरावर सर्वाेच्च स्थानी घेऊन जा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘सीए’चं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीज, 'आयसीएआय' पुणे शाखा व 'विकासा' शाखेच्या वतीने सीए विद्यार्थ्यांसाठी आयाेजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बाेलत हाेते. महालक्ष्मी लॉन येथे शनिवारी (दि. ८) सकाळी हा साेहळा पार पडला. या प्रसंगी 'आयसीएआय'च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए संजीवकुमार सिंघल, सीए डॉ. एस. बी. झावरे, विभागीय समिती सदस्य सीए रेखा धामणकर, सीए अभिषेक धामणे, 'आयसीएआय' पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, सचिव सीए निलेश येवलेकर, खजिनदार सीए नेहा फडके, परिषदेच्या समन्वयिका सीए प्रज्ञा बंब, कार्यकारिणी सदस्य सीए सारिका दिंडोकर, सीए प्रितेश मुनोत, सीए नंदकुमार कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. ओम केसकर व ओवी टोकेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर 'विकासा'चे व्हाइस चेअरमन श्रीयस नवले यांनी आभार मानले. सीए चंद्रशेखर चितळे, सीए डॉ. एस. बी. झावरे यांनीही कायम प्रयाेगशील राहण्याचे आवाहन केले. सतत शोध घेत राहिलात तर रस्ते आपाेआप मिळत जातील, असे चितळे म्हणाले.
जावडेकर म्हणाले की, आपल्यातील कला जिवंत ठेवा. अगदी मनापासून आणि समजून घेऊन शिका. जीवनात मेहनत, शिस्त आणि सातत्य ठेवा यश हमखास मिळतं. यश कसं मिळवावं हे भारतीय महिला क्रिकेटर्संनी नुकतेच दाखवून दिले आहे. प्रामाणिकपणा, वस्तुनिष्ठता, गोपनीयता, व्यावसायिकता, नम्रता हे गुण अंगी असतील आणि त्याआधारे नैतिक सराव करत असाल तर तुम्हाला कुणीही राेखू शकत नाही. याला उत्सुकतेची जाेड मिळाली तर मूल्यवर्धन करू शकाल आणि ती तुमची ओळख बनेल.