पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील 'हे' रस्ते वाहतुकीसाठी बंद; ‘पीएमपी’चेही ६६ मार्ग बदलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:57 IST2025-09-02T13:57:32+5:302025-09-02T13:57:57+5:30
वाहतुकीवरील निर्बंध लक्षात घेऊन पुणे मेट्रोनेही वेळापत्रक बदलले असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जादा फेऱ्या चालवल्या जाणार आहेत

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील 'हे' रस्ते वाहतुकीसाठी बंद; ‘पीएमपी’चेही ६६ मार्ग बदलले
पुणे: गणेशोत्सवानिमित्त देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्यवर्ती शहरातील १६ रस्ते सायंकाळी ५ नंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. तसेच १२ रस्त्यांवर जड वाहनांना पूर्ण प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. याशिवाय ‘पीएमपी’च्या ६६ मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे.
शहराच्या वैभवशाली गणेशोत्सवासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे शहराच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीवरील निर्बंध लक्षात घेऊन पुणे मेट्रोनेही वेळापत्रक बदलले असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जादा फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. त्याचबरोबर ‘पीएमपी’च्या तब्बल ६६ बसमार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
या बदलानुसार शास्त्री रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, कर्वे रोड, एफसी कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, सिंहगड रोड, गणेश रोड या रस्त्यांवर जड वाहनांवर पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. तसेच लक्ष्मी रोड : हमजेखान चौक ते टिळक चौक, शिवाजी रोड : गाडगीळ पुतळा चौक ते मंडई परिसर, बाजीराव रोड : पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक, टिळक रोड : हिराबाग चौक ते नेहरू स्टेडियम परिसर, तसेच सुभेदार तालीम, पानघंटी चौक, गंज पेठ चौक, सेंट्रल स्ट्रीट, जेधे प्रसाद रस्ता आदी रस्ते सायंकाळी ५ नंतर वाहतुकीस बंद राहणार आहेत.
नो-पार्किंग झोन
गणेशोत्सवात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खालील मार्गांवर संपूर्ण नो-पार्किंग लागू केले गेले आहे.
शिवाजी रोड : जिजामाता चौक ते मंडई चौक
लक्ष्मी रोड : मुंबई चौक ते शनिपार चौक
बाजीराव रोड : शनिपार चौक ते फुलकाबुरुज
आप्पा बळवंत चौक ते बुधवार पेठ