राहुल गांधींच्या वादग्रस्त भाषणाची सीडी मागितली; पेन ड्राईव्ह सादर, पुढील सुनावणी २५ मार्चला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 18:09 IST2026-03-17T18:08:00+5:302026-03-17T18:09:24+5:30
खटला दाखल करताना संपूर्ण प्रकरण संबंधित सीडीवर आधारित असल्याचे नमूद करण्यात आले होते; मात्र त्यावेळी पेन ड्राईव्ह न्यायालयात सादर करण्यात आलेला नव्हता.

राहुल गांधींच्या वादग्रस्त भाषणाची सीडी मागितली; पेन ड्राईव्ह सादर, पुढील सुनावणी २५ मार्चला
पुणे : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणात 'सीडी' हा महत्त्वाचा तांत्रिक पुरावा असल्याने त्याची प्रत देण्याची मागणी बचाव पक्षाने केली होती. मात्र, सीडीऐवजी पेन ड्राईव्ह देण्यात आल्याचे फिर्यादींनी मंगळवारी ( दि. 17) उलट तपासात मान्य केले असल्याची माहिती राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी दिली.
राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक विधान केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. पुण्यातील एमपीएमएलए विशेष न्यायालयात या दाव्याची सुनावणी सुरू आहे. राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्याकडून फिर्यादी सात्यकी सावरकर यांची उलट तपासणी चालू आहे. या प्रकरणात उलट तपासादरम्यान अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी विविध तांत्रिक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी फिर्यादींकडून काही महत्त्वाच्या बाबी मान्य करण्यात आल्या. न्यायालयात यापूर्वी सादर करण्यात आलेली भाषणाची सीडी तपासल्यावर ती ब्लँक (रिकामी) असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, याच सीडीच्या आधारे राहुल गांधी यांना समन्स बजाविण्यात आले होते. मात्र, सीडीऐवजी पेन ड्राईव्ह देण्यात आल्याचे फिर्यादींनी सांगितले. तसेच फिर्यादींकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या यूट्यूब लिंकसंदर्भात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार आवश्यक असलेले कलम ६५-ब अंतर्गत प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले नव्हते, ही बाबही उलट तपासादरम्यान समोर आली.
खटला दाखल करताना संपूर्ण प्रकरण संबंधित सीडीवर आधारित असल्याचे नमूद करण्यात आले होते; मात्र त्यावेळी पेन ड्राईव्ह न्यायालयात सादर करण्यात आलेला नव्हता. त्यानंतर नव्याने पेन ड्राईव्ह सादर करण्यात आल्याची बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आली. याशिवाय, सादर करण्यात आलेल्या ६५-ब प्रमाणपत्रांवर कोणत्याही तांत्रिक तज्ज्ञ किंवा अधिकृत व्यक्तीची सही नसल्याचेही उलट तपासादरम्यान स्पष्ट झाले असून, ही बाब फिर्यादींनी मान्य केली.