शासकीय निधीचा अपहर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 14:10 IST2026-01-11T14:09:48+5:302026-01-11T14:10:14+5:30
अनुसूचित जमातीच्या दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांच्या शेतात दर्जेदार फळबाग लागवड करण्यासाठी योजना मंजूर करण्यात आली होती.

शासकीय निधीचा अपहर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
घोडेगाव: येथील एकात्मिक आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमाती दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांना राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये ३१ लाख रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी मिलिंद नामदेव मडके यांच्याविरुध्द सहायक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केली आहे.
सन २०१३-१४ मध्ये आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीच्या दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांच्या शेतात दर्जेदार फळबाग लागवड करण्यासाठी योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील ३७ लाभार्थ्यांसाठी काम मंजूर झाले होते. ही योजना राबविण्याची जबाबदारी जुन्नर येथील संस्थेला देण्यात आली होती. योजनेसाठी एकंदरीत ९० लाख ५४ हजार ९०० रुपये इतका निधी मंजूर झाला होता.
संबंधित संस्थेने रक्कम घेऊनही प्रत्यक्षात योजनेतील अनेक ठिकाणी कामे अपूर्ण राहिल्याचे तपासातून स्पष्ट झाले. सन २०१९ मध्ये करण्यात आलेल्या तपासणीत ३७ कामांपैकी १५ ठिकाणीची कामे अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सन २०२१ व २०२२ मध्ये लाभार्थ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार चौकशी करण्यात आली असता संस्थेने शासनाच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून निधीचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आले. संस्थेकडून अपूर्ण कामांची रक्कम परत न करता उलट शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आहे.
सन २०२३ ते २०२५ या कालावधीत वारंवार नोटिसा बजावूनही संस्थेने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर वरिष्ठ स्तरावरून कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार ८ जानेवारी २०२६ रोजी संबंधित संस्थेविरोधात एकात्मिक आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमाती दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांना राबविण्यात आलेल्या फळ, भाजीपाला विकसित करण्याकरिता शेडनेटची उभारणी करण्यात अनियमितता व शासकीय निधीचा ३१ लाख ३ हजार २१८ रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार करत आहे.