५० हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 21:34 IST2020-11-28T21:33:10+5:302020-11-28T21:34:03+5:30
पत्रकाराला गुन्हा दाखल न करण्यासाठी मागत होता लाच

५० हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल
पुणे : गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर लाचेची मागणी केल्याचा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केला आहे.
राहुल शालिग्राम भदाणे (वय ३२) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. चाकण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत म्हाळुंगे पोलीस चौकीत ते कार्यरत होते. एका पत्रकाराने एकाकडून ३ लाख रुपये उसने घेतले होते. तो ते परत देत नसल्याने त्यांनी पत्रकाराविरोधात अर्ज केला होता. त्याची चौकशी राहुल भदाणे याच्याकडे होती. भदाणे याने या पत्रकाराला चौकशीसाठी बोलावले व गुन्हा दाखल करु नये, म्हणून ५० हजार रुपयांची मागणी केली होती. त्याची तक्रार या पत्रकाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्याची पडताळणी ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. तेव्हा पत्रकाराने काही पैसे कमी करा, अशी विनंती भदाणे याला केली होती. मात्र, त्यानंतर भदाणे याला हा पत्रकार असल्याचे समजल्याने त्याने पैसे स्वीकारले नाही. मात्र, लाचेची मागणी करण्यात आली असल्याने राहुल भदाणे याच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची मागणी केल्याचा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात केला. पोलीस निरीक्षक ज्योती पाटील अधिक तपास करीत आहेत.
शासकीय सेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे यांनी केले आहे.