लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, आर्थिक अडचण असल्याचे सांगत दागिने अन् पैसेही उकळले
By नितीश गोवंडे | Updated: December 24, 2023 16:56 IST2023-12-24T16:56:01+5:302023-12-24T16:56:11+5:30
मुंबईतील एका २९ वर्षीय तरूणीसोबत हा प्रकार घडल्याची बाब उघडकीस आली

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, आर्थिक अडचण असल्याचे सांगत दागिने अन् पैसेही उकळले
पुणे: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार होत असल्याच्या घटना शहरात दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबईतील एका २९ वर्षीय तरूणीसोबत असाच प्रकार घडल्याची बाब उघडकीस आली आहे. पीडितेने कोथरूड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शहरातील एका इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केला. तसेच, तिच्याकडून ९४ हजार रुपये रोख आणि १७ तोळे सोन्याचे दागिने उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
ईस्ट मुंबईतील ठाकुर्ली येथे राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीने शनिवारी (दि. २३) कोथरूड पोलिसांना फिर्याद दिली, त्यावरुन पोलिसांनी प्रसाद सावंत (३८, रा. रामबाग कॉलनी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च २०२३ ते २ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आरोपीच्या राहत्या घरी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने प्रसाद सावंत याने पीडितेशी ओळख केली. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, आरोपीने आर्थिक अडचण असल्याचे सांगून तरूणीकडून १७ तोळे सोन्याचे दागिने घेतले. तसेच ९४ हजार रुपये रोख घेऊन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दागिने आणि पैशांचा अपहार केला. तरूणीने सावंत याच्याकडे लग्नाबाबत विचारले असता त्याने टाळाटाळ केली. त्यानंतर तरुणीने पैसे परत मागितल्याने संतापलेल्या प्रसाद सावंत याने तिला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आडागळे करत आहेत.