...पण मलाही वजाबाकी करता येते, हे लक्षात ठेवा! पाटील आणि चाकणकरांचे अजितदादांनी टोचले कान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 16:36 IST2025-11-07T16:34:22+5:302025-11-07T16:36:19+5:30
रूपाली चाकणकर आणि माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील यांच्यामध्ये मागील काही महिन्यांपासून काही कारणांवरून धूसफूस सुरू आहे

...पण मलाही वजाबाकी करता येते, हे लक्षात ठेवा! पाटील आणि चाकणकरांचे अजितदादांनी टोचले कान
पुणे: आगामी महापालिका निवडणुकीसाठी युती होते ते आघाडी, याचा कसलाह विचार न करता महापालिकेच्या सर्व जागा लढण्याची तयारी ठेवा आणि आत्तापासूनच कामाला लागा, अशा सूचना उपमहापौर व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यापुणे शहरातील पदाधिकाऱ्यांना केले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तीन साडेतीन वर्षानंतर महापालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम करण्यात आली असून मतदार याद्यांची तपासणीही केली जात आहे. दोन चार दिवसांत आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मुंबईत पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष व राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, दुसरे शहराध्यक्ष सुभाष जगताप, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, दत्तात्रेय धनकवडे, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, रूपाली ठोंबरे पाटील आदींसह जवळपास ५० पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये अजित पवार यांनी शहरातील दोन्ही अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांकडून विविध प्रभागांची माहिती घेतली. पदाधिकाऱ्यांनीही अडीअडचणी व काही तक्रारी मांडल्या. त्यानंतर अजित पवार यांनी निवडणुकीसाठी युती होईल किंवा आघाडी होईल याचा विचार न करता कामाला लागा. महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मला वजाबाकी करता येते
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष व राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील यांच्यामध्ये मागील काही महिन्यांपासून या ना त्या कारणावरून धूसफूस सुरू आहे. फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणी ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांच्यावर तिखट शब्दात टीका केली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नाव न घेता काहीजण पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न समाज माध्यमे व प्रसार माध्यमांमधून करत आहेत. पण मलाही वजाबाकी करता येते, हे लक्षात ठेवा, असे म्हणत कान टोचल्याचे सूत्रांनी सांगितले.