बापाच्या 'हनीट्रॅप'च्या नादात लेकाचं ५ कोटींसाठी अपहरण; पुणे पोलिसांनी उसाच्या शेतात घुसून गुंडांना पकडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 20:17 IST2026-03-04T20:11:09+5:302026-03-04T20:17:46+5:30
पुण्यात ५ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या उद्योजकाच्या मुलाची अवघ्या काही तासांत सुटका

बापाच्या 'हनीट्रॅप'च्या नादात लेकाचं ५ कोटींसाठी अपहरण; पुणे पोलिसांनी उसाच्या शेतात घुसून गुंडांना पकडलं
Pune Crime: पुणे जिल्ह्यात एका स्थानिक बड्या मद्य व्यावसायिकाच्या १७ वर्षीय मुलाचे दिवसाढवळ्या अपहरण करून ५ कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा डाव पुणे ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला. थरारक पाठलागानंतर पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून अल्पवयीन मुलाची सुखरूप सुटका केली असून, हडपसर परिसरातील दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
भरदिवसा अपहरण आणि पोलिसांचा गराडा
मंगळवारी दुपारी हा तरुण आपल्या वडिलांच्या वाईन शॉपमधून बाहेर पडत असताना ही घटना घडली. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत वॉचमन काही वेळ बाजूला झाला असता, दोन मास्क घातलेल्या व्यक्तींनी झटापट करून या तरुणाला एका काळ्या कारमध्ये जबरदस्तीने बसवले आणि तिथून पळ काढला. वॉचमनने तात्काळ आरडाओरडा करून कुटुंबीयांना आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण पोलिसांनी तात्काळ सातारा हायवे, सासवड आणि जेजुरी परिसरात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले.
उसाच्या शेतात थरारक पाठलाग
तपासादरम्यान ही कार जेजुरी-लोणंद मार्गावरून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जेजुरी आणि नीरा पोलीस ठाण्याच्या पथकांनी पिसूर गावाजवळ नाकाबंदी केली होती. पोलिसांना पाहून आरोपींनी कारचा वेग वाढवला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अनेक किलोमीटर या कारचा पाठलाग केला. अखेर एका अरुंद रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उसाच्या शेतात घुसली आणि अडकली.
पोलिसांनी जवळ येताच आरोपींनी कार तिथेच सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना घेराव घालून पकडले. कारमध्ये सुरक्षित असलेल्या १७ वर्षीय मुलाची सुटका करण्यात आली.
हनीट्रॅपच्या बातमीवरून रचला कट
याप्रकरणी पोलिसांनी अक्षय लक्ष्मण इंगुळकर (मुख्य आरोपी) आणि अक्षय भालेराव (दोघेही रा. मांजरी, हडपसर) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हे अपहरण अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले होते. काही दिवसांपूर्वी पीडित मुलाच्या वडिलांना एका हनीट्रॅप प्रकरणात गोवण्यात आले होते, ज्यामध्ये मोठ्या आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा मीडियामध्ये झाली होती. हे वाचून आरोपींनी ठरवले की, जर मुलाचे अपहरण केले तर त्याचे वडील दबावाखाली येऊन ५ कोटींची खंडणी सहज देतील. त्यांनी अनेक दिवस मुलाच्या हालचालींवर पाळत ठेवली होती. दुसरीकडे पकडले जाऊ नये म्हणून आरोपींनी कारची नंबर प्लेटही बदलली होती.
पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक
पुणे ग्रामीण पोलिसांनी दाखवलेल्या या वेगवान कामगिरीमुळे एका मुलाचा जीव वाचला आणि ५ कोटींच्या खंडणीचा कट उधळला गेला. आरोपींना तुरुंगात पाठवून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.