व्यावसायिकास ४ काेटीचा गंडा; पाेलिसांच्या तावडीतून पसार झालेली बबली १० महिन्यानंतर जेरबंद
By नितीश गोवंडे | Updated: December 19, 2024 19:22 IST2024-12-19T19:21:19+5:302024-12-19T19:22:49+5:30
दुसऱ्या वेळी घराच्या छतावरून उडी मारून पळून जात असताना पाेलिसांनी शिताफीने तिचा पाठलाग करुन अटक

व्यावसायिकास ४ काेटीचा गंडा; पाेलिसांच्या तावडीतून पसार झालेली बबली १० महिन्यानंतर जेरबंद
पुणे: शहरातील एक नामांकित बिल्डर बाेलत असल्याचे सांगत, संबंधित बिल्डरच्या कंपनीच्या अकाऊंटला बिल्डरने दिलेल्या बँक खात्यात चार काेटी सहा लाख १७ हजार रुपये पाठवण्यास लावून गंडा घालणाऱ्या सायबर ठगी सानिया ऊर्फ गुड्डीया माेहम्मद मुस्तकीम साहब सिद्दीकी (२१, मुळ रा. बिहार) हिला एक वर्षापूर्वी सायबर पाेलिसांनी पकडले हाेते. परंतु पुण्याकडे तिला घेऊन येत असताना ती काेटा रेल्वे स्थानकावरून पळून गेली हाेती. पुणे सायबर पाेलिसांनी तिचा पुन्हा १० महिन्यांनंतर माग काढून बिहार मधील गाेपालगंज जिल्ह्यात लाेहरपत्ती, थावे येथे जाऊन पकडले. यावेळी पोलिस पथकाने वेशांतर करुन जवळच्या शेतात रात्रभर दबा धरून, तिच्या राहत्या घरात प्रवेश केला. त्यावेळी पोलिसांना बघून घराच्या छतावरून उडी मारून पळून जात असताना पाेलिसांनी शिताफीने तिचा पाठलाग करुन अटक केल्याची माहिती पाेलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिली.
याबाबत पुणे सायबर पाेलिस ठाण्यात आराेपीविराेधात गुन्हा दाखल आहे. तिला फेब्रुवारी २०२४ मध्ये सायबर पाेलिस ठाण्याचे पथकाने फरीदाबाद येथून ताब्यात घेतले हाेते. तिला पुण्याकडे रेल्वेतून घेऊन येत असताना ती पाेलिसांची नजर चुकवून काेटा रेल्वे स्थानकावरून पळून गेली हाेती. संबंधित आराेपी पळून गेल्यानंतर स्वत:चे अस्तित्व लपवून वेगवेगळे माेबाईल नंबर वापरून राहत हाेती. एक वर्षापासून ती फरार असल्याने पाेलिस आयुक्त अमितेश कुमार व पाेलिस उपायुक्त विवेक मासाळ यांनी सदर गुन्ह्याचा आढावा घेऊन आराेपी अटक करण्यासाठी मार्गदर्शन केले. सायबर तपास पथकाने दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आराेपीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करुन ती दिल्ली येथे असल्याची माहिती मिळवली. त्यानुसार पाेलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, उपनिरीक्षक संदीप कदम, महिला पोलिस कर्मचारी सिमा सुडीत, पाेलिस कर्मचारी संदीप पवार यांचे पथक दिल्ली येथे तिला पकडण्यास गेले. स्थानिक पाेलिसांच्या मदतीने जामियानगर भागात तिचा शाेध घेतला असता, पाेलिसांना तिच्याबाबत महत्वपूर्ण माहिती मिळाली व पाेलिस कर्मचारी अश्विन कुमकर यांना ती सिवान, बिहार येथे असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार संबंधित पाेलिसांचे पथक तात्काळ गाेपालगंज, बिहार येथे जाऊन त्यांनी तिचा शाेध घेऊन जेरबंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.