पुणे नाशिक मार्गालगत सांडभोरवाडीत भरदिवसा घरफोड्या; चोरट्यांनी ८ लाखांचे सोन्याचे दागिने पळवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 10:46 IST2025-10-30T10:45:47+5:302025-10-30T10:46:06+5:30
खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुणे नाशिक मार्गालगत सांडभोरवाडीत भरदिवसा घरफोड्या; चोरट्यांनी ८ लाखांचे सोन्याचे दागिने पळवले
राजगुरुनगर: पुणे नाशिक महामार्गालगत पानमळा (सांडभोरवाडी) आणि ढोरे भांबुरवाडी येथील टपेवस्ती (ता खेड ) या परिसरात बुधवारी (दि २९) दुपारी दरम्यान अज्ञात चोरट्याने दोन घरफोड्या कर करून ७ लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे नाशिक मार्गावर असलेल्या सांडभोरवाडीच्या पानमळा हद्दीत रेखा लक्ष्मण सांडभोर यांच्या घरी झालेल्या चोरीच्या घटनेची पोलिसात तक्रार दिली आहे. फिर्यादीनुसार, त्या घरालगत शेतात कामासाठी गेलेल्या होत्या. यादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराबाहेरील दरवाजाचे कोयंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्याने साडेसात तोळ्याचे सोन्याचे गंठण (किंमत अंदाजे ४ लाख,८७ हजार ५०० रुपये ), ६ ग्रॅमची सोन्याची अंगठी (३९ हजार), ५ ग्रॅमचे काळ्या मण्यात ओवलेले गंठण (३२५००), ३ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा (१९५०० ), २० ग्रॅमचा चांदीचा छल्ला (५००) आणि ४५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६ लाख,२४ हजार रुपयांचा ऐवज चोरला. याच दरम्यान ढोरे भांबुरवाडीच्या टपेवस्ती येथील अर्जुन भिमाशंकर गाढवे यांच्या घरातही अज्ञात चोरट्याने प्रवेश करून १ तोळ्याची सोन्याची चैन व नथ (६५०००), अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी (३२५००) आणि ७० हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. या घटनेबाबत खेड पोलिस अधिक तपास करीत आहेत.