धानोरे येथे डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून निर्घृण खून; दोन आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 09:37 IST2025-07-25T09:36:57+5:302025-07-25T09:37:12+5:30
पोलीस तपास पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींना शोधले

धानोरे येथे डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून निर्घृण खून; दोन आरोपींना अटक
आळंदी: धानोरे (ता. खेड) हद्दीत घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा तात्काळ छडा लावत आळंदीपोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून एका व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला होता. फिर्यादी लता प्रकाश भुते (वय ३८, रा. विकासवाडी, धानोरे, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. लाखांदूर, जि. भंडारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पती प्रकाश विठोबा भुते (वय ३९) यांचा खून करण्यात आला आहे.
सदरची घटना बुधवारी (दि.२३) सायंकाळी रात्रीच्या सुमारास आळंदी- मरकळ रस्त्यावरील धानोरे गावच्या हद्दीतील आय.जी.डब्ल्यू. टेक्नोलॉजीज कंपनीच्या बाजूला घडली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कुंडलिक ज्ञानदेव काळे (वय २१, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. दाभा, ता.मंळरूळपिर, जि. वाशिम) आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदाराला अटक केली. चौकशीत त्यांनी प्रकाश भुते यांच्यावर सिमेंटचा ब्लॉक टाकून त्यांचा खून केल्याची कबुली दिली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली.