Pune: दारू आणून दिली; भिंतीवर जोर-जोरात आदळून मारहाण; रक्ताच्या उलट्या होऊन तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:34 IST2025-05-06T16:33:41+5:302025-05-06T16:34:31+5:30
तू माझ्या चाच्याला दारू का आणून दिली, असा जाब विचारून घराच्या भिंतीवर जोर-जोरात आदळून हाताने तोंडावर मारहाण केली

Pune: दारू आणून दिली; भिंतीवर जोर-जोरात आदळून मारहाण; रक्ताच्या उलट्या होऊन तरुणाचा मृत्यू
पुणे: दारू आणून दिल्याच्या कारणातून दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने, रक्ताच्या उलट्या होऊन तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोपाल जयराम आचार्य (२५, रा. काशेवाडी, भवानीपेठ) असे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, खडक पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अमिर शेख आणि दानिश अली शेख या काका-पुतण्याला अटक केली. ही घटना शनिवारी (दि. ३) रात्री साडे आठच्या सुमारास काशेवाडी, भवानीपेठ परिसरात घडली आहे. याबाबत गोपाल याचे वडील जयराम लोकनंदन आचार्य (५१) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयराम हे काशेवाडी भवानीपेठ परिसरात राहण्यास आहेत. रिक्षा चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास वस्तीतील अमिर शेख याने जयराम यांचा मुलगा गोपाल याला दारू आणून देण्यास सांगितले होते. त्यानुसार त्याने अमिर याला दारू आणून दिली. त्याचा राग मनात धरून अमिर याचा पुतण्या दानिश याने गोपाल याच्यासोबत वाद घातला. तू माझ्या चाच्याला दारू का आणून दिली, असा जाब विचारून घराबाहेर घेऊन गेला. त्याला घराच्या भिंतीवर जोर-जोरात आदळून हाताने तोंडावर मारहाण केली. तसेच अमिर याने देखील गोपालला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. डोकेदुखी आणि रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने गोपाल याला त्याच्या घरच्यांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मारहाणीमुळे डोक्यात रक्तस्त्राव होऊन तोंडातून रक्त येऊन गोपालला रक्ताच्या उलट्या झाल्या. सोमवारी (दि. ५) दुपारी बाराच्या सुमारास गोपाल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास खडक पोलिस करत आहेत.