जेजुरीत शेतरस्त्याच्या वादातून सख्ख्या भावानेच केला भावाचा खून, २४ तासांत आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:47 IST2025-08-04T14:46:08+5:302025-08-04T14:47:34+5:30
जेजुरीत ही घटना चर्चेचा विषय ठरली असून, शेतजमिनीच्या वादातून उद्भवलेल्या या क्रूर कृत्याने सर्वांनाच हादरवून सोडले आहे

जेजुरीत शेतरस्त्याच्या वादातून सख्ख्या भावानेच केला भावाचा खून, २४ तासांत आरोपीला अटक
जेजुरी : पुरंदर तालुक्यातील मावडी क. प. येथे शेतातील रस्त्याच्या वादातून सख्ख्या भावाने भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जेजुरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या खुनाचा छडा लावून आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावडी क. प. येथील दाजीरच्या शेतात बाजरीच्या पिकात ज्ञानदेव लक्ष्मण भामे (वय ८२) हे मृतावस्थेत आढळून आले. ही माहिती जेजुरी पोलीस ठाण्यास मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालात ज्ञानदेव यांच्या डोक्यात खोल जखम झाल्याने रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे हा खून असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तपासाची गती वाढवली. तपासादरम्यान पोलिसांना मयत ज्ञानदेव यांचे लहान भाऊ चांगदेव लक्ष्मण भामे यांच्यामध्ये शेतातील रस्त्यावरून सातत्याने वाद होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चांगदेव याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. सुरुवातीला त्याने खुनाबाबत बोलण्यास नकार दिला, परंतु पोलिसांच्या कसून तपासानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चांगदेवने सांगितले की, ज्ञानदेव हे शेतातील रस्ता अडवत असल्याने त्यांच्यात वाद झाला. याच रागातून त्याने ३१ जुलै रोजी ज्ञानदेव यांना हाताने, लाथा-बुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत ज्ञानदेव यांच्या डोक्यात गंभीर जखम झाली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. जेजुरी पोलिसांनी २ ऑगस्ट रोजी चांगदेव भामे याला अटक केली. अवघ्या २४ तासांत या खुनाचा उलगडा करून पोलिसांनी तपासाची बाजू सक्षमपणे मांडली. ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, शेतजमिनीच्या वादातून उद्भवलेल्या या क्रूर कृत्याने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.