गुंड नीलेश घायवळ लंडनमध्ये असल्याची ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 20:25 IST2025-10-29T20:25:03+5:302025-10-29T20:25:53+5:30
गुंड घायवळ याने ‘गायवळ’ या नावाने बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवून परदेशात पलायन केले होते. त्याच्यावर खून, खंडणी, संघटित गुन्हेगारीसह गंभीर गुन्हे नोंद आहेत

गुंड नीलेश घायवळ लंडनमध्ये असल्याची ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाची माहिती
पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी गुंड नीलेश घायवळ लंडनमध्येच असल्याचे स्पष्ट झाले असून तशी माहिती ब्रिटनच्या उच्चायुक्त कार्यालयाने पुणे पोलिसांना मंगळवारी (दि. २८) कळवली. नीलेशचा नेमका ठावठिकाणा स्पष्ट झाल्याने त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती आली आहे. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला लवकरच देशात आणले जाईल, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. नीलेश घायवळसह त्याचा भाऊ सचिन घायवळ आणि अन्य साथीदारांवर कोथरूड पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे.
गुंड घायवळ याने ‘गायवळ’ या नावाने बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवून परदेशात पलायन केले होते. त्याच्यावर खून, खंडणी, संघटित गुन्हेगारीसह गंभीर गुन्हे नोंद आहेत. तसेच त्याने चुकीच्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळवला असून त्याला देशात आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. त्यामध्ये नीलेश बाबत माहिती मागवण्यात आली होती.
पोलिसांच्या या पत्राला ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाने ई-मेलद्वारे उत्तर दिले आहे. त्यानुसार घायवळ हा यूकेमध्येच असून तो व्हिजिटर व्हिसावर आल्याचे त्यांनी कळवले आहे. त्याचा व्हिसा फेब्रुवारी २०२६ पर्यंत वैध आहे.