दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; फक्त घोषणा होणं बाकी, पुण्यातून अजित पवार गटाच्या दत्ता धनकवडेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 16:31 IST2025-12-22T16:31:16+5:302025-12-22T16:31:54+5:30
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा तिढा सुटला असून तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळणार असल्याचे धनकवडे यांनी सांगितलं आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; फक्त घोषणा होणं बाकी, पुण्यातून अजित पवार गटाच्या दत्ता धनकवडेंचा दावा
पुणे: पुण्यात महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना अजित पवार गटाचे नेते दत्त धनकवडे यांनी पूर्णविराम दिला आहे. दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार असून त्याबाबत घोषणा होणं बाकी असल्याचा दावा त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना केला आहे. त्यामुळे शरद पवार यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे.
धनकवडे म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत. त्याचा काही विषय नाही. त्याबाबती मध्ये चर्चाही झालेल्या आहेत. फक्त आता घोषणा होणं बाकी आहे. ती लवकरच होईल. आपल्याला एक चांगली बातमी त्या माध्यमातून मिळेल. आता सगळा तिढा सुटलेला आहे. आज उद्या दोन दिवसात घोषणा झालीच पाहिजे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे बोलणं झालेलं आहे. दोन्ही पक्ष ते आता जाहीर करतील. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, देशाचे अध्यक्ष शरद पवार, अजितदादा, कार्याध्यक्षा सुप्रियाताई, शशिकांत शिंदे, सुनील तटकरे हे सर्वजण वरिष्ठ मंडळी एकत्र बसून हा निर्णय होणार आहे. तुतारी पण घड्याळावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
पुण्यातून मात्र शरद पवार गटाकडून धनकवडे यांच्या वक्तव्याला दुजोरा देण्यात आला नाही. शहराचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबाबत कोणताही प्रस्ताव न आल्याचे सांगितले आहे. आमच्यापर्यंत अजित पवार गटाचा अजूनही एकत्र लढण्याबाबत कुठलाही प्रस्ताव आला नाही. तो आल्यावर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया जगताप यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
दरम्यान अजित पवार यांनी काल माध्यमांशी बोलताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावरही सकारात्मक उत्तर दिले आहे. आम्ही यापूर्वी जेव्हा महाविकास आघाडीत होतो, तेव्हा स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देत असे. तशाच प्रकारे याबाबतही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, त्या - त्या जिल्हाध्यक्षांना व शहराध्यक्षांना दिले आहेत. मतांची विभागणी होऊ दिली नाही तर निवडून येणे सोपे जाते, त्यामुळे ते-ते अध्यक्ष निर्णय घेतील असे अजित पवारांनी सांगितले आहे.