पुणे रेल्वे स्थानकासह यरवडा, भोसरी परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देणारा निनावी फोन महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. या धमकीच्या फोननंतर पोलिसांनी ताबडतोब पुणे रेल्वे स्थानकासह सदर परिसरात शोध मोहीम सुरू केली. परंतु, पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या ११२ या आपत्कालीन क्रमांकावर आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास पुण्यातील रेल्वे स्थानक, भोसरी आणि नव चैतन्य महिला मंडळ या तीन ठिकाणांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन आला. या धमकीच्या कॉलनंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. पुणे पोलीस, रेल्वे संरक्षण दल, स्थानिक लोहमार्ग पोलीस, बॉम्ब शोध पथक, बंड गार्डन पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि श्वान पथक यांनी विविध ठिकाणी शोध घेतला. परंतु, त्यांना कुठेही कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळली नाही. ही धमकी फसवी असल्याचे निष्पन्न झाले. तरीही, खबरदारी म्हणून रेल्वे स्थानकावरील सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयालाही धमकीयाआधी मंगळवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला. खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय तातडीने रिकामे करण्यात आले. बॉम्ब शोध पथक आणि श्वान पथक यांनी कार्यालयाची कसून तपासणी सुरू केली. परंतु घटनास्थळी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली.