Pune Crime: नागापूर रस्त्याच्या बाजूला आढळला ३६ वर्षीय महिलेचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 18:40 IST2022-10-20T18:37:37+5:302022-10-20T18:40:56+5:30
महिलेला रुग्णवाहिकेद्वारे मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी ती उपचारापूर्वीच मयत झाली असल्याचे सांगितले..

Pune Crime: नागापूर रस्त्याच्या बाजूला आढळला ३६ वर्षीय महिलेचा मृतदेह
मंचर (पुणे ) : आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावच्या हद्दीत कारफाटा नागापूर रस्त्यावर आमराई मळा येथे रस्त्याच्या बाजूला ३६ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सदर महिलेचा मृत्यू हा अपघात होऊन झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
याबाबत संदीप दत्तू सूर्यवंशी यांनी मंचर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. संदीप सूर्यवंशी हा घटनास्थळी गेला असता सदर महिला ही त्याची लहान बहीण सुरेखा उर्फ अलका बाळू बर्डे (वय ३६, रा. सुलतानपूर) ही असल्याचे त्याने ओळखले. तसेच तिच्या चेहऱ्यावर, गालावर मार लागला होता. तिच्याजवळ थोड्याच अंतरावर एमएच १४ सीएच ५३८८ ही गाडी बाजूला पडलेली होती. तिला रुग्णवाहिकेद्वारे मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी ती उपचारापूर्वीच मयत झाली असल्याचे सांगितले.
मयत सुरेखा बर्डे हिचा पती दहा वर्षांपूर्वीच मयत झाला आहे. दरम्यान, सदर महिलेचा मृत्यू हा अपघात होऊन झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असून वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितले.