रेल्वे रुळावर आढळला ११ वर्षांच्या मुलाचा मृतदेह; किडनी काढून घेतल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:33 IST2025-12-12T13:33:03+5:302025-12-12T13:33:35+5:30
संबंधित मुलावर त्याचे वडील पतंग उडविण्याच्या कारणावरून ओरडले होते, त्यामुळे हा मुलगा रागावून रेल्वे रुळाच्या दिशेने गेला होता

रेल्वे रुळावर आढळला ११ वर्षांच्या मुलाचा मृतदेह; किडनी काढून घेतल्याचा संशय
हडपसर : येथील काळेपडळमधून जाणाऱ्या रेल्वे रुळावर ११ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याची किडनी काढून घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
प्रकाश दाबले भूल (वय ११, रा. गन्धर्व गीत सोसायटी, ससाणेनगर, हडपसर) असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.११) सकाळी सातच्या दरम्यान प्रकाशचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी या संदर्भात काळेपडळ पोलिसांना माहिती कळवली. घटनास्थळी दाखल झालेल्या सहायक निरीक्षक निंबाळकर व पोलिस अंमलदार भंडारी यांनी खासगी रुग्णवाहिका बोलावून मृतदेह ससून रुग्णालयात हलवला.
त्यानंतर त्याचा मृतदेह कमांड हॉस्पिटल येथे आणण्यात आला. त्याच्या कुटुंबीयांशी पोलिसांनी संपर्क साधण्यात आला असून मृत प्रकाशच्या पोटावर कापल्याचे व्रण असून त्याची किडनी काढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले कि, संबंधित मुलावर त्याचे वडील पतंग उडविण्याच्या कारणावरून ओरडले होते. त्यामुळे हा मुलगा रागावून रेल्वे रुळाच्या दिशेने गेला होता. त्याच्या वडिलांना याची माहिती होती. त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नव्हता. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. मात्र, त्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी रेल्वे रुळावर आढळून आला. त्याच्या पोटावरील व्रण ह्या रेल्वे कटिंगच्या आहेत. त्यामध्ये वेगळा काही प्रकार नसल्याचे पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.