घरगुती गॅस सिलिंडरचा काळा बाजार; ६१ गॅस टाक्या जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 19:34 IST2025-01-12T19:33:31+5:302025-01-12T19:34:29+5:30

गॅसचा काळा बाजार करणाऱ्या एकाला अटक करून त्याच्याकडून टेम्पोसह ६१ गॅस सिलिंडर जप्त

Black market of domestic gas cylinders; 61 gas tanks seized | घरगुती गॅस सिलिंडरचा काळा बाजार; ६१ गॅस टाक्या जप्त 

घरगुती गॅस सिलिंडरचा काळा बाजार; ६१ गॅस टाक्या जप्त 

पुणे : घरगुती गॅस सिलिंडरचा साठा करून त्याची अवैधरीत्या सुरू असलेली विक्री सिंहगड रोड पोलिसाच्या पथकाने उघडकीस आणली. गॅसचा काळा बाजार करणाऱ्या एकाला अटक करून त्याच्याकडून टेम्पोसह ६१ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.

विकास धोंडाप्पा आकळे (३१, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक, मूळ. रा. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आकळे याच्यावर दोन महिन्यांपूर्वीदेखील अशाप्रकारे कारवाई करण्यात आली होती. सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर होते. त्यादरम्यान वडगाव बुद्रुक भागात एकाने अवैधरीत्या गॅसचा साठा केला असून, त्याची चोरून विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथे एक टेम्पो उभा असलेला दिसला.

पोलिसांनी त्याची पाहणी केली असता, त्यामध्ये गॅसच्या टाक्या आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी विकास आकळे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याने या गॅस सिलिंडर कोणाकडून आणले, त्याची विक्री कुठे केली जाते, याबाबतचा तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहेत.

ही कारवाई सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, कर्मचारी संजय शिंदे, आण्णा केकाण आणि उत्तम तारू यांच्यासह पथकाने केली.  

Web Title: Black market of domestic gas cylinders; 61 gas tanks seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.