घरगुती सिलिंडरचा काळाबाजार, चौघांच्या जेजुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 10:51 IST2024-12-28T10:50:52+5:302024-12-28T10:51:14+5:30
चार तरुण विनापरवाना बेकायदेशीरपणे घरगुती गॅसच्या टाकीमधून व्यावसायिक टाकीमध्ये मशिनद्वारे इंधन गॅस हस्तांतरित करून विक्री करत होते

घरगुती सिलिंडरचा काळाबाजार, चौघांच्या जेजुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या
जेजुरी : घरगुती गॅस वापराच्या सिलिंडरमधून मशिनच्या साहाय्याने व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस हस्तांतरित करून या टाक्या काळ्या बाजाराने विकणाऱ्या टोळीचा जेजुरीपोलिसांनी पर्दाफाश करत मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये २६७ गॅस सिलिंडर, गॅस हस्तांतरित करण्याचे मशिन, वजनकाटे व एक चारचाकी वाहन असा सुमारे १२ लक्ष ६४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पुरंदर तालुका पुरवठा निरीक्षक अश्विनी चंद्रकांत वायसे यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील गुळुंचे -कर्नलवाडी हद्दीतील सत्यवान जगन्नाथ निगडे यांच्या बंद असलेल्या पोल्ट्री शेडमध्ये अत्यंत धोकादायक रीतीने मानवी जीवन धोक्यात येईल, अशा पद्धतीने चार तरुण विनापरवाना बेकायदेशीरपणे घरगुती गॅसच्या टाकीमधून व्यावसायिक टाकीमध्ये मशिनद्वारे इंधन गॅस हस्तांतरित करून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार अचानक धाड टाकून मुद्देमालासह मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. यामध्ये पांडुरंग चंद्रकांत गोफणे, अभिजित दत्तात्रय बरकडे (दोघे रा. मोराळवाडी, ता. बारामती), विश्वजित बाजीराव यमगर (रा. पिरोळे, ता. माळशिरस, जि.सोलापूर), तुकाराम चंद्रकांत खताळ (रा. कापसी, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, चंद्रकांत झेंडे, हवालदार दशरथ बनसोडे, विठ्ठल कदम, अण्णासाहेब देशमुख, संदीप भापकर यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.