राष्ट्रवादीच्या निनावी पत्रामागे भाजपचा हात ; ''या'' नेत्याचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 08:15 PM2019-08-12T20:15:31+5:302019-08-12T20:31:26+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करताना मराठा समाजाचा निकष वापरल्याचा आरोप करत पक्षाच्या कार्यकर्त्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

BJP's anonymous letter from NCP; Critical accusation of "this" NCP leader | राष्ट्रवादीच्या निनावी पत्रामागे भाजपचा हात ; ''या'' नेत्याचा गंभीर आरोप 

राष्ट्रवादीच्या निनावी पत्रामागे भाजपचा हात ; ''या'' नेत्याचा गंभीर आरोप 

googlenewsNext

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करताना मराठा समाजाचा निकष वापरल्याचा आरोप करत पक्षाच्या कार्यकर्त्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र संबंधित व्यक्तीने हा पत्रात स्वतःचे नाव लिहिले नसून पक्षाच्या शहर कार्यकारिणीच्या निवडीबाबत नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांना पत्राची प्रत पाठवणार असल्याचे नमूद केले आहे. याच पत्रावर आता विविध प्रतिक्रिया उमटत असून माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी तर थेट सत्ताधारी भाजपवर आरोप केले आहेत. 

नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या होत्या. त्यात महिला, युवती, युवक, विद्यार्थी अशा विभागांचा समावेश होता. आता त्या नेमणुकांबाबत एका कार्यकर्त्याने थेट नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात माजी शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.त्यावर आता चव्हाण यांच्यासह काकडे यांनीही प्रतीक्रिया दिली आहे. 

  

ते म्हणाले, ''सांगली, कोल्हापूर येथे महापुराने जे थैमान घातले आहे, त्यावर मात करण्यासाठी राज्यसरकारची यंत्रणा कुचकामी ठरली. अशावेळी नागरिकांचा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. याला छेद द्यायला हवा म्हणून भाजप जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहेत. आम्ही खोलात जाऊन पत्राची चौकशी करू. हे पत्र भारतीय जनता पक्ष किंवा आर एस एस यांच्यापैकी कोणत्यातरी कार्यकर्त्याचे कारस्थान असेल. 

चव्हाण म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गुणवत्तेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. यादी करतानाही सामाजिक समतोल राखण्याचा कायम प्रयत्न असतो. पहिली यादी आली आहे त्यात समतोल साधला नसेल तर लवकरच पुढचीही यादी जाहीर केली जाईल. यापूर्वीही असा प्रकार झाला आहे. असं पत्र कोणी पाठवत असेल तर चुकीचे आहे. 

दरम्यान  या पत्रात म्हटले आहे की, 'पक्षाने केलेल्या नेमणुका मराठा समाजाच्या असून अल्पसंख्यांक सेलमध्येही याच समाजाच्या व्यक्तींची नेमणूक करावी म्हणजे राष्ट्रवादी पक्ष मराठा समाजाचा आहे असे समजेल. शिवाय चव्हाण यांच्या काळात एन जी ओ संस्था बळकट झाल्या आणि पक्ष संघटनेचे वाटोळे झाल्याचे म्हटले आहेत. सध्याचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्यावरही पार्ट टाईम काम करत असल्याचा आरोप करण्यात आहे. १५ ते २० कार्यकर्त्यांना घेऊन रोज आंदोलन केल्याने सत्ता येत नसते असा टोलाही लगावला आहे. फक्त शरद पवार किंवा अजित पवार आल्यावर व्यासपीठावर बसण्यासाठी स्पर्धा असते असेही म्हटले आहे. या पत्राचा शेवट करताना यावर लवकरात लवकर सुधारणा करावी अन्यथा विधानसभा निवडणुकीनंतर कितीही मोठे ऑपरेशन केले तरी पक्ष संघटना कोमात गेलेली दिसेल'. 

Web Title: BJP's anonymous letter from NCP; Critical accusation of "this" NCP leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.