प्रभाग रचनेतून भाजप, शिवसेनेची राजकीय खेळी;उद्धव ठाकरे आणि अजित पवार गटास शह दिल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:13 IST2025-10-07T15:10:30+5:302025-10-07T15:13:14+5:30
- अनुसूचित जातीचे प्रभाग फोडले; महापालिका निवडणुकीआधीच एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करण्यास प्रारंभ

प्रभाग रचनेतून भाजप, शिवसेनेची राजकीय खेळी;उद्धव ठाकरे आणि अजित पवार गटास शह दिल्याची चर्चा
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना भाजप आणि शिवसेना शिंदे गटास अनुकूल बनवल्याचा आरोप होत आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उद्धव ठाकरे गटास आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटास शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अनुसूचित जातीचे प्रभाग फोडण्यात आल्याचे दिसत आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेस अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्यात तीन प्रभागांत बदल केले आहेत. त्यातील दोन प्रभाग भोसरीतील आमदार लांडगे यांच्या भागातील आणि एक प्रभाग खासदार बारणे यांच्या भागातील आहे. या रचनेत ठाकरे गट आणि अजित पवार गटास फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे.
मुलगा आणि पुतण्या सुरक्षित, ठाकरे गटाचे माजी शहराध्यक्ष अडचणीत
खासदार बारणे यांचे प्रभावक्षेत्र असणाऱ्या पदमजी पेपर मिल, गणेशनगर प्रभाग २४ मध्ये मागीलवेळी चारपैकी एक जागा अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव होती. यातून शिवसेनेचे सचिन भोसले निवडून आले होते. पुढे ते ठाकरे गटाचे शहराध्यक्ष झाले. आता यातील म्हातोबा वस्ती हा परिसर प्रभाग २५ वाकडला जोडला आहे. त्यामुळे या प्रभागातील अनुसूचित जातीची मतदारसंख्या कमी होणार आहे. परिणामी या गटाचे आरक्षण राहणार नाही. त्यामुळे भोसले यांना उभे राहण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. गेल्यावेळी २४ मधून बारणे यांचे पुतणे नीलेश बारणे निवडून आले होते. यावेळी मुलगा विश्वजित इच्छुक आहे. त्यामुळे मुलगा आणि पुतण्या या दोघांना सुरक्षित करण्यासाठी बारणे यांनी यातील परिसर प्रभाग २५ ला जोडल्याची चर्चा आहे.
अनुसूचित जातीचे प्रभाग फोडण्याचा घाट
भोसरीच्या आमदारांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या भोसरी आणि चिखलीतील दोन प्रभाग फोडले आहेत. प्रारूप प्रभाग रचनेत चिखली (प्रभाग क्रमांक १) मध्ये समाविष्ट असलेली ताम्हाणेवस्ती आता अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक १२ तळवडेत जोडली आहे. तळवडे प्रभागात चारही नगरसेवक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. नवीन बदलाचा परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो. येथील अनुसूचित जाती जागेवर तो परिणाम होणार आहे. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे यांच्या प्रभाग सहामधील गावजत्रा मैदान आणि महापालिका हॉस्पिटल हा भाग भोसरी गावठाणात जोडला आहे. विधानसभा निवडणुकीत रवी लांडगे यांनी आमदार लांडगे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे आता प्रभाग रचनेतून उट्टे काढण्याचे काम आमदारांनी केल्याची चर्चा आहे.
आमच्या वॉर्डातील भाग दुसऱ्या भागास जोडणे हे सत्ताधाऱ्यांनी केलेले कारस्थान आहे. हेतूपूर्वक अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात टाकले आहेत. हा सत्तेचा गैरवापर आहे; पण आमचा निवडणूक लढविण्याचा अधिकार हिरावून कुणी घेऊ शकत नाही. - सचिन भोसले, माजी शहराध्यक्ष, शिवसेना ठाकरे गट