भाजपच्या मध्यस्थीने निघाली नाराज शिंदेसेनेची समजूत; शिवसेना ठाकरेंचीच चुकून बोलल्याचा केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 09:07 IST2025-01-17T09:07:33+5:302025-01-17T09:07:51+5:30
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला.

भाजपच्या मध्यस्थीने निघाली नाराज शिंदेसेनेची समजूत; शिवसेना ठाकरेंचीच चुकून बोलल्याचा केला खुलासा
पुणे : उद्धव ठाकरे यांना सोडून ते भारतीय जनता पक्षात आले. मात्र, प्रवेश झाल्यावर बोलताना खरी शिवसेना ठाकरेंचीच असे बोलून गेले. त्यामुळे महायुतीत असलेल्या शिंदेसेनेतील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यानंतर मात्र भाजपनेच मध्यस्थी करत नाराज शिंदेसेनेला समजावले व शिवसेना ठाकरेंचीच, असे चुकून बोलल्याचा खुलासा भाजपवासी मंडळींनी केला.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. झाले असे की, शिवसेना नेत्यांकडून पुणे शहराकडे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका करत उद्धवसेनेतील विशाल धनवडे, बाळा ओसवाल, प्राची आल्हाट, संगीता ठोसर व पल्लवी जावळे या ५ माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की खरी शिवसेना कोणाची? त्यावर त्यांनी त्वरित खरी शिवसेना ठाकरेंचीच असे उत्तर दिले. त्यामुळे महायुतीत भाजपबरोबर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यातील शिलेदार नाना भानगिरे व त्यांचे सहकारी संतप्त झाले.
भाजपने त्यांना समजवावे, अन्यथा त्यांना आमच्या स्टाईलने उत्तर द्यावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला हाेता. पुण्यात असा वाद असणे योग्य नाही, पुढे तो वाढू शकतो, असे लक्षात आल्याने मंत्री पाटील यांनी यात त्वरित मध्यस्थी केली. नाना भानगिरे व विशाल धनवडे यांची त्यांनी स्वत:च्या उपस्थितीत भेट घडवून आणली. त्यासाठी संक्रांतीचा ‘तिळगुळ घ्या गोड बोला’चा मुहूर्त निवडला.
या भेटीत धनवडे यांनी आम्हाला प्रश्न विचारल्यानंतर अनावधानाने ते उत्तर गेले, यातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर मी दिलगिरी व्यक्त करतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदेसेनेबद्दल आमच्या सर्वांच्या मनात नितांत प्रेम, आदर आणि विश्वास आहे, असे सांगितले. त्यावर भानगिरे यांनीही या खुलाशानंतर आमच्या मनात त्यांच्याबद्दल कसलाही आक्षेप नाही. पुणे शहराच्या विकासासाठी यापुढे आम्ही महायुती म्हणून एकदिलाने काम करू, अशी ग्वाही दिली.