VIDEO: भाजपाचेही काँग्रेससारखेच (ला)क्षणिक उपोषण; पुण्याचा आमदारांचा सँडविच-मिठाईवर आडवा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 02:36 PM2018-04-12T14:36:18+5:302018-04-12T14:36:18+5:30

भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सर्व खासदार आणि कार्यकर्त्यांना विशेष सूचना करण्यात आल्या होत्या.

BJP leaders one day fast washout due to MLA eating Sandwich and Sweets | VIDEO: भाजपाचेही काँग्रेससारखेच (ला)क्षणिक उपोषण; पुण्याचा आमदारांचा सँडविच-मिठाईवर आडवा हात

VIDEO: भाजपाचेही काँग्रेससारखेच (ला)क्षणिक उपोषण; पुण्याचा आमदारांचा सँडविच-मिठाईवर आडवा हात

Next

पुणे: काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या देशव्यापी उपोषणाचा फज्जा उडाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी भाजपाकडून करण्यात आलेलेही उपोषणही 'इन्स्टंट'च ठरले. भाजपाच्या पुण्यातील बाळा भेगडे व भीमराव तापकीर या दोन आमदारांनी सँडविच आणि मिठाईवर आडवा हात मारल्याचे व्हीडिओ सध्या व्हायरल झाले आहेत.

काँग्रेसमुळेच अधिवेशनाचा अमूल्य वेळ वाया गेला, असा भाजपचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील भाजपाच्या खासदार आणि आमदारांकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरासमोर उपोषणासाठी भाजपाचे नेते जमले होते. यामध्ये बाळा भेगडे व भीमराव तापकीर यांचाही समावेश होता. सुरूवातीचा काहीवेळ उपोषणस्थळी हजेरी लावल्यानंतर हे दोघेही जलयुक्त शिवार व खरीप नियोजनाच्या सरकारी बैठकीसाठी गेले. त्याठिकाणी बैठकीच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे खाण्यासाठी सँडविच, वेफर्स आणि मिठाई टेबलावर ठेवण्यात आली. तेव्हा मात्र बाळा भेगडे आणि भीमराव तपकीर यांना उपोषणाचा विसर पडला आणि त्यांनी सँडविच, वेफर्स व मिठाईवर ताव मारायाल सुरुवात केली. काहीवेळातच याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर याबद्दल विचारले असता या दोन्ही आमदारांनी आम्ही सकाळपासून उपाशी असल्याचे कारण सांगितले. मात्र, या प्रकारामुळे पुणे भाजपावर चांगलीच नामुष्कीची वेळ ओढावली आहे.

यापूर्वी अॅट्रॉसिटीच्या मुद्यावरुन मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसकडून एक दिवसाचे उपोषण करण्यात आलं होतं. मात्र या उपोषणाआधी काँग्रेस नेते छोले भटुरे खात असल्याची छायाचित्रं समोर आली आणि भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधला होता. काँग्रेससारखी नामुष्की आपल्यावर ओढवू नये, यासाठी भाजपाचे नेते कामाला लागले होते. यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सर्व खासदार आणि कार्यकर्त्यांना विशेष सूचना करण्यात आल्या होत्या. सार्वजनिक ठिकाणी खाणं टाळा. उपोषणाला येण्याआधी काही खात असाल, तर त्यावेळी फोटो काढू नका, अशा सूचना भाजपाच्या नेत्यांना देण्यात आल्या होत्या. 

Web Title: BJP leaders one day fast washout due to MLA eating Sandwich and Sweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.