पुणे : पुण्यातील ओढ्यांच्या सीमा भिंती बांधण्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी आणला म्हणून पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व भाजपच्या नेत्यांनी संपूर्ण शहरात बॅनरबाजी केली. प्रत्यक्षात शासनाकडून हा निधी आलाच नाही. आता पुन्हा खासदार म्हणत आहेत, हा निधी पुन्हा आणतो. याचा अर्थ निधीच्या माध्यमातून भाजप नेत्यांनी पुणेकरांची दिशाभूल व फसवणूक केली आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केला आहे.
निवडणुकीत फसवायचे आणि निवडून आल्यावर अधिकाऱ्यांना झापायचे, मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असा खेळ प्रशासन आणि भाजप सत्ताधारी करीत आहेत. नालेसफाईत हात की सफाई नको, असे आयुक्तांना व प्रशासनाला खडसावून सांगणारे मोहोळ आणि त्यांच्या नेत्यांनी ओढ्याच्या सीमा भिंतींसाठी शासनाकडून २०० कोटी निधी आणला म्हणून संपूर्ण पुणे शहरात बॅनरबाजी केली होती. शेवटी तो निधी आलाच नाही.
ही पुणेकरांची दिशाभूल आहे. इतके दिवस फक्त स्वतःसाठी निधी आणि टेंडरसाठीच चकरा मारणारे भाजपचे नगरसेवक आत्ता अचानक प्रशासनाला धारेवर धरतायत. पुणेकर सुज्ञ आहेत. अबकी बार भाजप हद्दपार, असेच होणार असल्याचे मोरे यांनी नमूद केले आहे.