भाजप सत्तेसाठी काहीही करतो; सर्वसामान्य पेटून उठत नसेल, तर ही लोकशाहीची हत्याच, थोरातांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 14:14 IST2025-12-08T14:13:25+5:302025-12-08T14:14:08+5:30
आमच्या काळात मुख्यमंत्र्यांवर साधे आरोप झाले तरी कॉंग्रेसकडून राजीनामा घेतला जात होता

भाजप सत्तेसाठी काहीही करतो; सर्वसामान्य पेटून उठत नसेल, तर ही लोकशाहीची हत्याच, थोरातांचा घणाघात
पुणे : भाजप सत्तेसाठी काहीही करतो. मते मिळविण्यासाठी वेगवेगळे फंडे राबवले जातात. भाजपच्या काळात मतांची चोरी होते. कुस्तीपटूंवर अत्याचार करणारे मोकाट फिरतात. सोनम वांगचुक यांचा दोष नसताना तुरुंगात टाकले जाते. इतके होत असतानाही जर सर्वसामान्य पेटून उठत नसेल, तर ही खरोखर लोकशाहीची हत्या आहे, असे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी आयोजित केलेल्या ‘लोकशाहीची हत्या?, वोटचोरी’ या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बाळासाहेब थोरात बोलत होते. कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, गोपाळ तिवारी, वीरेंद्र किराड, अविनाश बागवे, स्वाती शिंदे, लता राजगुरू आदी उपस्थित होते.
भाजप मते मिळविण्यासाठी वेगवेगळे फंडे राबवत आहेत. त्यापैकी धार्मिक ध्रुवीकरण, सरकारचे पैसे वाटणे, ईव्हीएमचा घोटाळा, मतदारांची संख्या कमी करणे, वाढवणे असे अनेक मार्ग आहेत. हे लपूनछपून नाही तर उघड–उघड केले जाते. आमच्या काळात मुख्यमंत्र्यांवर साधे आरोप झाले तरी कॉंग्रेसकडून राजीनामा घेतला जात होता, असे सांगून बाळासाहेब थोरात म्हणाले, भारताचा रशिया कायम मित्र आहे. आता पुन्हा भाजपवर जुने मित्र जोडण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचा विचार हा पुरोगामी आहे. सर्व समाजसुधारकांच्या विचारांतून तयार झालेला आहे. कॉंग्रेसच्या काळात शिक्षणाचा अधिकार, अन्नसुरक्षेचा अधिकार, आरोग्याचा अधिकार भूसंपादन कायद्यात बदल केला.
लोकशाही वाढविण्यासाठी पुणेकरांनी पुढाकार घ्यावा
समाजात चर्चा होऊन चुकतेय कुठे हे पाहणं, चुकत असेल तर त्यावर बोट ठेवून ते दुरुस्त करायला लावणे ही भूमिका पुणेकरांनी पूर्वी स्पष्टवक्तेपणाने घेतली आहे. पुणेकर मंडळी जागरूक आहेत. आता देशातील लोकशाही धोक्यात आहे. ही लोकशाही वाचवण्यासाठी पुण्याने पुढाकार घ्यायला हवा, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.