"भाजप राजकीय फायद्यासाठी मराठा आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर करते राज्य शासनालाच बदनाम"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 16:48 IST2021-06-13T16:48:50+5:302021-06-13T16:48:59+5:30
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा आरोप, तर मराठा समाजाला आरक्षण मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यात कोणीही आडकाठी आणू नये, अशी त्यांची स्पष्ट भूमिका

"भाजप राजकीय फायद्यासाठी मराठा आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर करते राज्य शासनालाच बदनाम"
पुणे: मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून मराठा समाज आणि ओबीसींची देशपातळीवर जातनिहाय जनगणना केल्यास सर्वांनाच न्याय मिळेल. परंतु राज्यातील भारतीय जनता पक्ष राजकीय फायदा घेण्यासाठी दोन्ही समाजाच्या प्रश्नांवर राज्य शासनाला बदनाम करत आहे. असा आरोप राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यात कोणीही आडकाठी आणू नये, अशी विनंती करतच राज्यातील प्रत्येक जात, घटकाला आपल्या न्याय, हक्क, आरक्षण आदी विविध मागण्यांसाठी लढण्याचा अधिकार असल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
अभय बंग महान जगव्यापी सामाजिक नेते
राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली. यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकार आणि तुमच्यावर टीका केली. या प्रश्नाला उत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, अभय बंग हे महान सामाजिक नेते, चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांच्या अफाट प्रयत्नामुळे महाराष्ट्र व्यसनमुक्त झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात त्यांच्यामुळे एकही माणूस तंबाखू अथवा सिगारेट पित नाही. त्यामुळे त्यांना बोलण्याचा, टीका करण्याचा पूर्ण अधिकार असल्याची मिश्किल टिपणी त्यांनी यावेळी केली.
रस्त्यावर बसणाऱ्या वि'स्मृती'बाई सध्या कुठे आहेत ?
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात ६०-७० रुपये पेट्रोल असताना भाजपच्या स्मृती इराणी या रस्त्यावर बसून आंदोलन करत होत्या. आता त्यांच्याच पक्षाचे सरकार असताना पेट्रोलचे भाव १०५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, त्यावर आता त्या वि'स्मृती'बाई कुठे आहेत. त्या बोलत नाहीत. आता त्या कुठे गायब झाल्या आहेत. आम्हाला सापडल्या की त्यांना याबाबत आम्ही आठवण करून देऊ, असा हल्ला वडेट्टीवार यांनी केला.
लोणावळ्यात ओबीसींचा राज्यस्तरीय मेळावा घेणार
राज्यातील ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी तसेच समाजाच्या इतर विविध मागण्यांसाठी येत्या २६ आणि २७ जूनला लोणावळा येथे मेळावा घेणार आहे. त्यात विविध गोष्टींची चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.