Chitra Wagh : "पुन्हा एकदा समाज म्हणून आपण हरलो, ५० तोळं सोनं…"; चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 17:08 IST2026-01-27T17:06:03+5:302026-01-27T17:08:12+5:30
BJP Chitra Wagh : चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.

Chitra Wagh : "पुन्हा एकदा समाज म्हणून आपण हरलो, ५० तोळं सोनं…"; चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप
पुण्यामध्ये हुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पती, सासू-सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीप्ती मगर चौधरी असं महिलेचं नाव आहे. याप्रकरणी हेमलता बाळासाहेब मगर यांनी तक्रार दिली आहे. आत्महत्या केलेल्या विवाहितेची सासू ही सरपंच आहे. तर सासरा शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. "पुन्हा एकदा समाज म्हणून आपण हरलो…" असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. तसेच "हुंडा म्हणजे पैशांचा नाही, आयुष्याचा सौदा असतो. पालकांनो, मुलीच्या “सुखासाठी” हुंडा देणं म्हणजे सुरक्षितता नाही—आता तरी जागे व्हा" असं म्हटलं आहे.
"पुन्हा एकदा समाज म्हणून आपण हरलो… उच्चशिक्षित दीप्ती चौधरीने सासरच्या अमानुष जाचाला कंटाळून आपल्या तीन वर्षांच्या चिमुकलीसमोर आत्महत्या. ५० तोळे सोनं, ३५ लाख रुपये व कारसाठी २५ लाख देऊनही छळ थांबला नाही. मुलगी झाली म्हणून दोष, गर्भलिंग तपासणी व गर्भपाताचा दबाव—सलग ६ वर्षांचा छळ अखेर असह्य ठरला आणि दीप्तीने आयुष्य संपवलं."
पुन्हा एकदा समाज म्हणून आपण हरलो…
\— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 27, 2026
उच्चशिक्षित दीप्ती चौधरीने सासरच्या अमानुष जाचाला कंटाळून आपल्या तीन वर्षांच्या चिमुकलीसमोर आत्महत्या. ५० तोळे सोनं, ३५ लाख रुपये व कारसाठी २५ लाख देऊनही छळ थांबला नाही. मुलगी झाली म्हणून दोष, गर्भलिंग तपासणी व गर्भपाताचा दबाव—सलग ६ वर्षांचा…
"याप्रकरणात पती रोहन चौधरी, सासरे कारभारी चौधरी, सासू सुनीता चौधरी व दीर रोहित चौधरी ताब्यात आहेत. पद, शिक्षण, प्रतिष्ठा कोणालाही वाचवणार नाही. या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा होणारच... पण मुलींनो—उच्च शिक्षण घेताय तर हुंड्याविरुद्ध उभं राहण्याची धमक ठेवा. हुंडा म्हणजे पैशांचा नाही, आयुष्याचा सौदा असतो. पालकांनो, मुलीच्या “सुखासाठी” हुंडा देणं म्हणजे सुरक्षितता नाही—आता तरी जागे व्हा" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
दिप्ती चौधरीचं लग्न रोहन कारभारी चौधरी याच्याशी झालं होतं. लग्नामध्ये ५० तोळं सोनं देण्यात आलं. लग्नानंतर २५ डिसेंबर २०१९ पासून २४ जानेवारी २०२६ दरम्यान दिप्तीकडे चारचाकी वाहन घेण्यासाठी पैशाची मागणी करण्यात येत होती. तसेच एक महिन्यानंतर तिला सासरकडून मानसिक व शारिरीक छळ सुरू झाला.
चरित्रावर संशय घेणे, दिसायला सुंदर नाही, घरातली कामं येत नाहीत असे वेगवेगळे आरोप करत तिचा छळ करण्यात आला. वेळोवेळी पैशांची मागणी करून पैसे घेतले जात होते. तसेच तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व प्रकारच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून दिप्ती हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.