पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदार अशोक टेकवडे करणार भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 13:54 IST2023-05-15T13:53:42+5:302023-05-15T13:54:13+5:30
राष्ट्रवादीतील गटबाजी आणि घुसमट सहन न झाल्याने, त्याचबरोबर सातत्याने अन्याय होत असल्याने भाजपात जाण्याचा निर्णय

पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदार अशोक टेकवडे करणार भाजपात प्रवेश
जेजुरी: पुरंदर तालुक्यातील माजी आमदार अशोक टेकवडे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. पुण्यातील बालगंधर्व येथे १८ तारखेला होणाऱ्या कार्यक्रमात भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदींच्या उपस्थितीत ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. अशोक टेकवडे यांच्या भाजप प्रवेशामुळे पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता असून पक्षातील एक मोठा गट अशोक टेकवडे यांच्या सोबत जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे .
या संदर्भात माजी आ. अशोक टेकवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही आपण भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. भाजप पक्षप्रवेशाबद्दल बोलताना आपण कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही. उलट पक्षप्रवेशामुळे आपणास पुरंदर तालुक्यातील विकास कामांना आणखीन गती देता येणार आहे. असे वक्तव्य आ. टेकवडे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजी आणि घुसमट सहन न झाल्याने, त्याचबरोबर सातत्याने अन्याय केला जात असल्यानेच आ.टेकवडे यांनी हा निर्णय घेतल्याचे चर्चा आहे.