Bhor Local Body Election Result 2025: भोरमध्ये 'गड आला पण सिंह गेला' अशी अवस्था; भाजपची एकहाती सत्ता मात्र नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 17:26 IST2025-12-21T17:25:23+5:302025-12-21T17:26:22+5:30
Bhor Local Body Election Result 2025 भाजपने २० पैकी १६ जागा जिंकल्या तरी नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे रामचंद्र (नाना) आवारे यांनी भाजपच्या उमेदवाराचा १७० मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे

Bhor Local Body Election Result 2025: भोरमध्ये 'गड आला पण सिंह गेला' अशी अवस्था; भाजपची एकहाती सत्ता मात्र नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा
भोर : भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २० पैकी १६ जागा जिंकून पालिकेवर एकहाती सत्ता मिळवली असली, तरी नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे रामचंद्र (नाना) आवारे यांनी भाजपच्या उमेदवाराचा १७० मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. त्यामुळे “गड आला पण सिंह गेला” अशी अवस्था भाजपची झाल्याचे चित्र भोरमध्ये पाहायला मिळाले.
या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. माजी नगरसेवक चंद्रकांत मळेकर तसेच माजी नगरसेविका आशा शिंदे यांचे पती बजरंग शिंदे यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक २ मध्ये आशु ढवळे व जयश्री शिंदे यांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे निकाल लावण्यात आला. त्यात माजी नगराध्यक्ष जयश्री शिंदे यांचा विजय घोषित करण्यात आला. सर्वाधिक ४२६ मतांनी भाजपचे अमित सागळे विजयी झाले, तर सर्वात कमी २० मतांच्या फरकाने राष्ट्रवादीच्या सुरेखा मळेकर यांनी विजय मिळवला.
सकाळी १० वाजता कान्होजी जेधे शासकीय आयटीआय येथे निवडणूक निर्णय अधिकारी प्राजक्ता घोरपडे व सहायक निवडणूक अधिकारी गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात झाली. प्रभाग क्रमांक १ ते ५ ची मतमोजणी एकाच वेळी करण्यात आली. पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसने दोन प्रभागांत आघाडी घेतली, तर प्रभाग क्रमांक ३ ते १० मध्ये भाजपने आघाडी घेतली. फक्त प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आघाडी घेतली. नगराध्यक्षपदाच्या पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार संजय जगताप यांनी २४५ मतांची आघाडी घेतली होती. मात्र, पुढील फेऱ्यांत रामचंद्र आवारे यांनी प्रभाग क्रमांक १, ३, ४, ८, ९ व १० मध्ये आघाडी घेत अखेरीस १७० मतांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाच्या दोन्ही प्रमुख उमेदवारांना आपापल्या प्रभागात आघाडी घेता आली नाही.
या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष तृप्ती किरवे यांचे पती जगदीश किरवे, माजी नगरसेवक अमित सागळे, सुमंत शेटे, स्नेहा पवार, माजी नगरसेवक गणेश पवार यांच्या पत्नी मनीषा पवार, माजी नगरसेवक समीर सागळे यांच्या पत्नी पल्लवी सागळे, माजी नगरसेवक देविदास गायकवाड यांच्या पत्नी मयूरी गायकवाड तसेच माजी नगरसेवक केदार देशपांडे यांनी विजय मिळवला आहे. स्थानिक राजकारणात प्रभाव असलेल्या भेलके-पाटील गटाचे दोन नगरसेवक प्रथमच नगरपालिकेत निवडून आले आहेत. जगदीश किरवे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला असून, गेल्या सलग ३५ वर्षांपासून त्यांच्या कुटुंबात नगरसेवक पद आहे.
विजयी उमेदवारांची नावे
प्रभाग क्रमांक १ अनिल भेलके, सुरेखा मळेकर
प्रभाग क्रमांक २ कुणाल धुमाळ, जयश्री शिंदे
प्रभाग क्रमांक ३ जगदीश किरवे, रेणुका बदक
प्रभाग क्रमांक ४ अमित सागळे, तृप्ती सुपेकर
प्रभाग क्रमांक ५ जयवंत शेटे, मयूरी गायकवाड
प्रभाग क्रमांक ६ मनीषा गणेश पवार, कुणाल पलंगे
प्रभाग क्रमांक ७ गणेश मोहिते, स्नेहल घोडेकर
प्रभाग क्रमांक ८ सचिन तारू, पल्लवी सागळे
प्रभाग क्रमांक ९ मनीषा भेलके, केदार देशपांडे
प्रभाग क्रमांक १० सुमंत शेटे, स्नेहल पवार
भोर शहरातील नागरिकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवून भोरची ‘बारामती’ करण्याचा प्रयत्न करणार आहे. -रामचंद्र आवारे, नगराध्यक्ष
लोकांनी अनेक वर्षांची भाजपची सत्ता यावेळी बदलली आहे. पाणीपुरवठा योजना, शाळा, सांडपाणी व्यवस्था व झोपडपट्टीतील घरे अशा विकासकामांतून शहराचा कायापालट केला जाईल. -शंकर मांडेकर, आमदार
भाजपचे २० पैकी १६ नगरसेवक निवडून आले असून, नगराध्यक्षपदाचा उमेदवार अल्प मतांनी पराभूत झाला असला तरी पालिकेत भाजपचीच एकहाती सत्ता आली आहे.- संग्राम थोपटे, माजी आमदार