भूतदया परमो धर्म! पोलिसांमुळे सुरक्षारक्षक भिंतीच्या गजामध्ये अडकलेल्या कुत्र्याला मिळाले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 15:36 IST2021-05-13T15:36:45+5:302021-05-13T15:36:53+5:30
दुचाकीवरून जाताना बीएसएनएल कार्यालयानजीक आल्यानंतर त्यांना कुत्र्याच्या विव्हळण्याचा आला आवाज

भूतदया परमो धर्म! पोलिसांमुळे सुरक्षारक्षक भिंतीच्या गजामध्ये अडकलेल्या कुत्र्याला मिळाले जीवदान
पुणे: पोलीस कर्मचाऱ्यांना पहाटे तीनला पेट्रोलिंग करताना कुत्र्याचा जिवाच्या आकांताने विव्हळण्याचा आवाज येतो. जवळ जाऊन पाहताच तर सुरक्षारक्षक भिंतीच्या गजामध्ये कुत्रे अडकल्याचे दिसते. बरीच धडपड करून देखील कुत्रे सुटत नव्हते. अशा वेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कुत्र्याचा जीव वाचतो. गजामध्ये अडकलेल्या कुत्र्याला जीवदान मिळते. असा प्रसंग लष्कर परिसरात घडला आहे. त्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होऊ लागले आहे.
पुणे शहरातील लष्कर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल विनायक जोशी व सलमान शेख कॅम्प परिसरात गुरुवारी पहाटे पेट्रोलिंग करत होते. दुचाकीवरून येथील बीएसएनएल कार्यालयानजीक आल्यानंतर त्यांना कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज आला. जोशी व शेख यांनी जवळ जाऊन पाहिले असता कुत्रे बीएसएनएल कार्यालयाच्या सुरक्षा रक्षक भिंतीमध्ये असणाऱ्या गजामध्ये पूर्णतः अडकले होते.
कुत्र्याचा चेहरा दोन्ही गजामध्ये अडकला असल्याने कुत्रे जिवाच्या आकांताने ओरडत होते. यावेळी प्रसंगावधान दाखवत पोलिस कॉन्स्टेबल विनायक जोशी यांनी कुत्र्याचा चेहरा गजातून सोडवला चेहरा मोकळा झाल्यानंतर धडपड करून कुत्र्याने आपले शरीर देखील सोडवून घेतले. जवळपास १० मिनिट कुत्र्याला सोडवण्याचे प्रयत्न सुरू होते. यावेळी सोबत असणारे पोलिस कॉन्स्टेबल सलमान शेख यांनी या प्रसंगाचा व्हिडीओ काढला. तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. पोलिसांनी दाखवलेल्या या भूतदये बद्दल अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.