पुणे : भीमा कोरेगाव दंगलीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र व संबंधित कागदपत्रांसह मंगळवारी (दि.१३) भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर हजर राहण्याची शक्यता आहे.आयोगाने शरद पवार यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र आणि संबंधित कागदपत्रे ३० एप्रिल किंवा त्यापूर्वी दाखल करण्याचे लेखी निर्देश दिले होते. तशी नोटीसही आयोगाने पवार यांना बजावली होती, परंतु पवार यांनी आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कागदपत्रे दाखल केली नाहीत. त्यामुळे आयोगाने पुन्हा पवार यांना नोटीस बजावून मंगळवारी (दि. १३) कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पवार हे आयोगासमोर हजर राहून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र आणि संबंधित कागदपत्रे दाखल करण्याची शक्यता आहे.
या पत्रात पवारांनी काय म्हटले होते?पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रामध्ये, ‘ही दंगल म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कट होता. भीमा कोरेगाव दंगलीच्या वेळी फडणवीस सरकारने सत्तेचा गैरवापर केला. दंगलीच्या सूत्रधारांना पाठीशी घातले. दंगलीचे पुरावे पोलिसांनी मोडून तोडून सादर केले. सरकारने पोलिसांच्या मदतीने कट रचला व राज्यातील जनतेची फसवणूक केली,’ असा आरोप करून भीमा कोरेगाव दंगलीची एसआयटी चौकशी करण्याची मागणी या पत्रामध्ये पवार यांनी केली होती.