Bhigwan Case: भिगवणचे ‘कथित अपहरण’, राजकीय हस्तक्षेप, कुटुंबाचा आक्रोश अन् तरुण-तरुणी बारामतीत हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 21:14 IST2026-02-20T21:02:25+5:302026-02-20T21:14:37+5:30

Bhigwan Case पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवून चौकशी सुरू केली असून, तरुणीचे समुपदेशनही करण्यात आले आहे

Bhigwan Case Bhigwan alleged kidnapping political interference family outcry and young men and women present in Baramati | Bhigwan Case: भिगवणचे ‘कथित अपहरण’, राजकीय हस्तक्षेप, कुटुंबाचा आक्रोश अन् तरुण-तरुणी बारामतीत हजर

Bhigwan Case: भिगवणचे ‘कथित अपहरण’, राजकीय हस्तक्षेप, कुटुंबाचा आक्रोश अन् तरुण-तरुणी बारामतीत हजर

बारामती : भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाला गुरुवारी मध्यरात्री नाट्यमय वळण मिळाले. संबंधित तरुण व तरुणी स्वतःहून बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवून चौकशी सुरू केली असून, तरुणीचे समुपदेशनही करण्यात आले आहे. संवेदनशील पार्श्वभूमी लक्षात घेता शहर पोलिस ठाणे आणि न्यायालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

घटनेनंतर पोलिसांच्या सहा पथकांकडून दोघांचा शोध सुरू होता. अपहरणानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवडमार्गे दोघे महाबळेश्वर येथे गेल्याची माहिती तपासात समोर आली. तेथून परत येत गुरुवारी मध्यरात्री दीड वाजता दोघे बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिस ठाण्यात मुलीचा जबाब नोंदविण्यात आला. तिने “मी माझ्या मर्जीने गेले,” असे स्पष्ट केले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी घरच्यांना बोलावले असता ते येण्यास तयार नसल्याचे समजते. त्यानंतर संबंधित तरुणीला मोठ्या पोलिस बंदोबस्तात सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालय परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. न्यायालयात जबाब नोंदवल्यानंतर तिला तत्काळ सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

कुटुंबाला धमक्या

दरम्यान, न्यायालय परिसरात दाखल झालेल्या कुटुंबीयांनी मुलीची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भेट न झाल्याने त्यांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. काही कुटुंबीयांनी माध्यमांसमोर येत तीव्र भावना व्यक्त केल्या. संबंधित प्रकरणात आमदार राहुल कूल यांच्यावर पाठबळ दिल्याचा आरोप करत घोषणाबाजी करण्यात आली. “आमच्या कुटुंबाला धमक्या देण्यात आल्या. दबावामुळेच मुलगी त्यांच्यासोबत गेली,” असा आरोपही कुटुंबीयांनी केला.

...तर अशी वेळ आली नसती

मुलीच्या आईने माध्यमांसमोर बोलताना भावनिक आवेशात अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तणावपूर्ण वातावरणामुळे काही काळ न्यायालय परिसरात गोंधळाचे चित्र होते. यावेळी काही नातेवाइकांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण काढत भावना व्यक्त केल्या. “दादा असते तर अशी वेळ आली नसती,” असे त्यांनी म्हटले.

तरुणीचा आई-भावाकडे जाण्यास नकार

प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल दिवसभर बारामतीत तळ ठोकून होते. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “दोघे शहर पोलिस ठाण्यात आले असून, जबाब नोंदविण्यात आला आहे. मुलीचा न्यायालयासमोरही जबाब नोंदविला आहे. तिचे आणि कुटुंबीयांचे म्हणणे वेगवेगळे आहे. दोन्ही बाजूंचा बारकाईने तपास सुरू आहे.“तरुणीने आई आणि भावाकडे जाण्यास नकार दिला आहे. तिचे मत विचारात घेऊन महिलागृहात ठेवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. पुढील तपासात जाबजबाब, पुरावे तपासले जातील,” असेही गिल यांनी स्पष्ट केले. सदर प्रकरणातील आरोपीला सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञात स्थळी हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title : भिगवन 'अपहरण' मामला: युगल प्रकट, राजनीतिक दबाव, पारिवारिक विरोध प्रदर्शन

Web Summary : भिगवन के कथित अपहरण मामले में मोड़ आया जब युगल बारामती में प्रकट हुआ। लड़की ने कहा कि वह स्वेच्छा से गई, परिवार ने राजनीतिक दबाव और धमकियों का आरोप लगाया। जांच जारी रहने से तनाव बना हुआ है।

Web Title : Bhigwan 'Kidnapping' Twist: Couple Appears, Political Pressure, Family Protests Erupt

Web Summary : Bhigwan's alleged kidnapping case took a turn as the couple appeared in Baramati. The girl stated she went willingly, amidst family accusations of political pressure and threats. Tensions remain high as investigations continue.