Bhide Bridge Pune: भिडे पूल पुन्हा बंद, काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 13:07 IST2025-10-25T13:07:33+5:302025-10-25T13:07:41+5:30
महामेट्रोच्या डेक्कन स्थानकापासून नारायण पेठ आणि सदाशिव पेठ परिसराला जोडण्यासाठी मुठा नदीवर भिडे पुलाच्या वरील बाजूस पादचारी पूल उभारला जात आहे

Bhide Bridge Pune: भिडे पूल पुन्हा बंद, काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे नियोजन
पुणे : दिवाळीसाठी खुला केलेला नदीपात्रातील बाबा भिडे पूल दिवाळी संपताच पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, येथील पादचारी पुलाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
महामेट्रोच्या डेक्कन स्थानकापासून नारायण पेठ आणि सदाशिव पेठ परिसराला जोडण्यासाठी मुठा नदीवर भिडे पुलाच्या वरील बाजूस पादचारी पूल उभारला जात आहे. या कामासाठी गेल्या काही महिन्यांपासून पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. नारायण पेठेतून डेक्कन जिमखान्याकडे जाणारे, तसेच नदीपात्रातील रस्त्याने डेक्कन जिमखाना आणि नारायण पेठेत ये-जा करणारे वाहनचालक या पुलाचा वापर करतात. मात्र, पूल बंद असल्याने वाहनचालकांना वळसा घालून पुन्हा डेक्कन जिमखान्याकडे यावे लागत होते. दिवाळीत होणारी गर्दी लक्षात घेऊन ११ ऑक्टोबरपासून पूल सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत वाहतुकीस खुला करण्यात आला होता. मात्र, दिवाळीच्या खरेदीसाठी शहरात होणारी गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोकडून ११ ऑक्टोबरपासून तो खुला करण्यात आला होता. दिवाळी संपताच शुक्रवार सकाळपासून तो पुन्हा बंद करण्यात आला.
दरम्यान, पादचारी पुलाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यामुळे मध्यवर्ती पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. पुलाचे अर्धे स्ट्रक्चरचे काम पूर्ण झाल्याने महामेट्रोकडून आता डिसेंबर २०२५ अखेर पुलाचे काम पूर्ण करण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.