वडिलांच्या उपचाराच्या नावाखाली पैसे घेत विश्वासघात; तरुणीच्या खुनामागचं नेमकं कारणं आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 09:53 IST2025-01-09T09:52:56+5:302025-01-09T09:53:52+5:30
वडिलांच्या ऑपरेशन, ट्रिटमेंटसाठी पैसे लागत असल्याचे सांगून वेळोवेळी तरुणांकडून कडून तब्बल ४ लाख उकळले होते

वडिलांच्या उपचाराच्या नावाखाली पैसे घेत विश्वासघात; तरुणीच्या खुनामागचं नेमकं कारणं आलं समोर
पुणे : तिने वडिलांना हाय शुगर आहे, त्यांच्या ऑपरेशन, ट्रिटमेंटसाठी पैसे लागत आहेत, असे सांगत वेळोवेळी कृष्णा कडून तब्बल ४ लाख रुपये घेतले होते. त्यानंतरही तिची मागणी थांबत नव्हती, त्यामुळे कृष्णाला संशय आला. शेवटी काही दिवसांपूर्वी तो कराड येथे गेला. तिच्या वडिलांना भेटला. तेव्हा त्यांनी आपली कसलीच शस्त्रक्रिया झाली नाही, अथवा शुगरच्या उपचारासाठी इतके पैसे मी तिच्याकडे मागितले नाही, असे सांगितले. आपल्याला वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून विश्वासघात केल्याची भावना कृष्णाच्या मनात निर्माण झाली. त्यामुळेच कृष्णाने तिच्याकडे उसने घेतलेले पैसे मागण्यास सुरुवात केली. तेव्हा झालेल्या वादावादीत विश्वासघाताच्या दु:खातून त्याने कोयत्याचा घाव तिच्या हातावर घातला. त्यात तिच्या हाताच्या नसा तुटल्या. ती लो शुगरची रुग्ण असल्याने तिचे रक्त गोठले जाण्याची प्रक्रिया न झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला अन् त्यातच तिचा मृत्यू झाला.
येरवडा येथील डब्ल्यू.एन.एस. कंपनीच्या पार्किंगमध्ये मंगळवारी (दि. ७) सायंकाळी झालेल्या शुभदा शंकर कोदारे (२८, रा.बालाजीनगर, कात्रज) हिच्या खुनाचे कारण समोर आले आहे. शुभदाचा खून केल्याप्रकरणी कृष्णा सत्यनारायण कनोजा (२८, रा.खैरेवाडी, शिवाजीनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी शुभदाची बहीण साधना शंकर कोदारे (२६, रा.जगदंबा बिल्डिंग, काळेवाडी फाटा, पिंपरी चिंचवड) हीने येरवडापोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
शुभदा आणि साधना हा दोन्ही बहिणी आयटी सेक्टरमध्ये काम करतात. त्या पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्या मूळच्या कराडच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचे वडील कराडला राहतात. शुभदा आणि कृष्णा हे दोघे डब्ल्यू.एन.एस. कंपनीत अकाउंट विभागात असले, तरी वेगवेगळ्या सेक्शनमध्ये काम करत होते. दोघांची २०२२ पासून ओळख होती. शुभदा हिने आपले वडील मधुमेहाचे रुग्ण असून, त्यांच्यावर उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे कृष्णाला सांगितले होते.
शुभदा हिलाही लो शुगरचा त्रास होता. त्यामुळेच तिने आतापर्यंत लग्न केले नव्हते. वडिलांच्या आजाराचे कारण सांगून शुभदा हिने त्याच्याकडून २५ हजार, ५० हजार रुपये असे सातत्याने उसने पैसे घेतले होते. कृष्णाने आपली सहकारी अडचणीत असल्याचे पाहून तिला वेळोवेळी मदत केली होती. कृष्णाची साधना कोदारे हिच्याशीही ओळख होती. त्यांच्यात प्रामुख्याने पैशांच्या कारणावरूनच बोलणे झाले होते. शुभदा कायम त्याच्याकडे पैसे मागत असून, परत देण्याचे नाव काढत नव्हती. त्याच्याकडून तिने आतापर्यंत ४ लाख रुपये घेतले होते. त्यामुळे कृष्णाला संशय येण्यास सुरुवात झाली. विश्वासघात केल्यामुळे तिला धमकावण्याचा हेतू ठेवून त्याने कंपनीच्या पार्किंगमध्ये शुभदाला गाठले. यावेळी त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. वाद वाढल्याने रागाच्या भरात कृष्णाने जोरात ४-५ वार तिच्या हातावर केले. हे वार इतके जोरात होते की, त्यात शुभदाच्या हाताच्या नसा पूर्णपणे तुटल्या. तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि कार्डियाक अटॅक येऊन तिचा मृत्यू झाला. कृष्णा कनोजा याला अटक केल्यानंतर त्याने ही हकीकत जबाबात दिली. शुभदा कोदारे हिचा मृत्यू झाल्याने तिची अथवा तिच्या नातेवाइकांचे म्हणणे अद्याप समोर आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.