लाडक्या बहिणी तुपाशी, अंगणवाडी ताई उपाशी; लाखो रुपयांचे भत्ते थकले, योजनेच्या अर्जांचे मानधनही प्रलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 18:04 IST2025-12-12T18:03:49+5:302025-12-12T18:04:27+5:30
लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रूपये देणाऱ्या सरकारने त्याच बहिणींसाठी काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लाखो रूपयांचे भत्ते मात्र थकवले आहेत

लाडक्या बहिणी तुपाशी, अंगणवाडी ताई उपाशी; लाखो रुपयांचे भत्ते थकले, योजनेच्या अर्जांचे मानधनही प्रलंबित
पुणे: राज्यातील १ कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रूपये देणाऱ्या सरकारने त्याच बहिणींसाठी काम करणाऱ्या राज्यातील काही काही लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लाखो रूपयांचे भत्ते मात्र थकवले आहेत. लाडकी बहीण योजनेचे अर्ज जमा करण्यासाठीचे मानधनही अनेक जिल्ह्यांमध्ये प्रलंबित ठेवण्यात आले आहे.
राज्यात अंगणवाडी योजनेत काही लाख महिला सेविका व मदतनीस म्हणून काम करतात. सेविकेला १० हजार व मदतनीस महिलेला ८ हजार रूपये मानधन मिळते. त्यात वाढ व्हावी अशी अनेक वर्षांची मागणी होती. सरकारने ती ऑक्टोबर २०२४ मध्ये मान्य केली. सेविकेला १५ हजार रूपये, मदतनिसाला १३ हजार रूपये मानधन देणार असे जाहीर केले. प्रत्यक्षात सेविकेला १३ हजार व मदतनिसाला १० हजार रूपये देण्याचे पत्रक काढले. उर्वरित रक्कम ॲप आधारित कामांच्या टक्केवारीवर प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येईल असे जाहीर करून त्याचे कोष्टकही जाहीर केले.
त्यानुसार ॲप आधारित कामे (माता, बालके यांची गृहभेट, पोषण आहार वाटप, पूर्व शालेय शिक्षण दिवस भरणे, आजारपणाची संख्या कमी करणे ही कामे करून ती ॲपवर अपलोड करणे) ७० टक्के पूर्ण केली तर १४०० रूपये, ८० टक्के झाली तर १६०० रूपये, ९० टक्के झाली तर १८०० रूपये व १०० टक्के झाली तर २ हजार असे निश्चित केले. मदतनीस महिलांनाही याच प्रमाणे ७००, ८०० व पुढे ९००, १ हजार रूपये असा प्रोत्साहन भत्ता निश्चित केला. जास्त पैसे मिळणार या आशेने अंगणवाडी सेविका व मदतनिस ऑक्टोबर २०२४ पासून काम करत आहेत, मात्र हा प्रोत्साहन भत्ता फक्त मदतनिस महिलांच्याच बँक खात्यात जमा झाला आहे.
राष्ट्रीय मजदूर संघाच्या अंगणवाडी विभागाच्या पदाधिकारी गीतांजली थिटे, जयश्री जठार, सुजाता शेडगे, सरोजिनी भांबरे यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेत सुरूवातीच्या काळात अनेक महिलांना आम्ही अर्ज लिहुन दिले. त्यासाठीही आम्हाला मानधन मिळणार होते, मात्र तेही अद्याप अनेक ठिकाणी मिळालेले नाही. प्रोत्साहन भत्ता व हे मानधन यातून सरकारकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लाखो रूपये थकले आहेत. ते मिळावेत अशी मागणी राष्ट्रवादी मजदूर संघाच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे असे थिटे यांनी सांगितले.