Love Marriage: प्रेमविवाह केल्याच्या रागातून युवकाला मारहाण, पत्नीचंही केलं अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 17:06 IST2021-09-28T17:06:11+5:302021-09-28T17:06:20+5:30
पत्नीचा चुलत भाऊ आणि साथीदारांसह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Love Marriage: प्रेमविवाह केल्याच्या रागातून युवकाला मारहाण, पत्नीचंही केलं अपहरण
बारामती : प्रेमविवाह केल्याच्या रागातून युवकाला हॉकीस्टीकने, हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्या पत्नीचे अपहरण केल्याचा प्रकार रविवारी शहरातील मोतानगरशेजारी घडला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात संबंधित युवकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याच्या पत्नीचा चुलत भाऊ आणि साथीदारांसह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल हनुमंत माळवदकर ( सध्या रा. बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत दादासाहेब गायकवाड, गोपीनाथ भाऊसाहेब गायकवाड ( दोघे रा. बाभुळगाव दुमाला), पप्पू कवडे व राहूल खरात (दोघे रा. कात्रज) यांच्यासह दोघा अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माळवदकरने सज्ञान असलेल्या नात्यातीलच महिलेशी पळून जाऊन रजिस्टर पध्दतीने प्रेमविवाह केला आहे. या विवाहाला तिच्या घरच्यांचा विरोध होता. रविवारी ते खरेदीसाठी बाहेर पडल्यानंतर दोन मोटारीतून सहाजण आले. त्यात माळवदकर यांच्या पत्नीचा चुलतभाऊ प्रशांत, गोपीनाथ व त्यांचे मित्र होते. त्यांनी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून त्यांनी हॉकीस्टीकने, हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच माळवदकर याना पकडून ठेवले. एका मोटारीत त्यांच्या पत्नीला मारहाण करत जबरदस्तीने मोटारीत बसण्यास भाग पाडत तिचे अपहरण केले. त्यानंतर पुन्हा फियार्दीला मारहाण करत तिघे दुसऱ्या गाडीतून निघून गेल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.