किरकोळ कारणावरून मारहाण! गार वडापाव दिल्याने काचेची बरणी फेकून मारली, बालेवाडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 12:37 IST2024-11-15T12:36:54+5:302024-11-15T12:37:18+5:30

वडापाव गार दिल्याने दोघांनी विक्रेत्याशी भांडण केले, तसेच दुकानात तोडफोडही केली 

Beating for a minor reason A glass jar was thrown after giving cold vada pav an incident in Balewadi | किरकोळ कारणावरून मारहाण! गार वडापाव दिल्याने काचेची बरणी फेकून मारली, बालेवाडीतील घटना

किरकोळ कारणावरून मारहाण! गार वडापाव दिल्याने काचेची बरणी फेकून मारली, बालेवाडीतील घटना

पुणे: बालेवाडी परिसरात वडापाव गार असल्याच्या कारणावरून स्नॅक्स सेंटर चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दोघांनी वडापाव विक्रेत्यावर काचेची भरणी फेकून मारत चहाचा थर्मास फेकून देत तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी चतु:श्रृंगी (बाणेर) पोलिस ठाण्यात प्रकाशचंद्र शंकरलाल जोशी (वय ४५, रा. बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंकुश कोंडीबा ढेबे (२३) याच्यासह त्याच्या एका मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जोशी यांचे बालेवाडी परिसरातील साई चौक येथे शिवकृपा स्नॅक्स सेंटर आहे. त्याठिकाणी बुधवारी (दि. १३) दुपारी बाराच्या सुमारास ढेबे व त्याचा एक मित्र सेंटरवर आले होते. त्यांनी वडापाव मागितला. वडापाव दिल्यानंतर तो गार आहे, यावरून वाद घातला. वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यावेळी आरोपींनी दुकानातील चहाचा थर्मास खाली फेकून तो फोडला. तर ढेबे याने काऊंटरवरील काचेची भरणी हातात घेऊन ती जोशी यांच्या दिशेने फेकून मारली. यात त्यांच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. त्यानंतर दोघेही तेथून पसार झाले. गार वडापाववरून मारहाण झाल्याने परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती. पुढील तपास पोलिस कर्मचारी रायकर करत आहेत.

Web Title: Beating for a minor reason A glass jar was thrown after giving cold vada pav an incident in Balewadi