पुणे: सरकारच्या मद्य विक्री धोरणांमुळे राज्यातील ‘बार आणि लाउंज बार’ व्यवसाय बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याविरोधात राज्याच्या परवाना कक्षेतील ‘बार आणि लाउंज बार’ सोमवारी (दि. १४) एक दिवसासाठी बंद ठेवले जाणार आहे. याला पाठिंबा देत पुण्यातही बार बंद राहतील, अशी माहिती पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष जवाहर चोरगे, विश्वनाथ पुजारी, सचिव राजेश शेट्टी, खजिनदार मोहन शेट्टी उपस्थित होते.
राज्य शासनाने मद्य विक्रीवरील व्हॅट ५ टक्क्यांवरून १० टक्के केले, परवाना शुल्कात १५ टक्के वाढ केली आणि भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावर उत्पादन शुल्कात ६० टक्क्यांनी वाढ केली आहे. राज्याच्या परवाना क्षेत्रातील १९ हजार, तर पुण्यात ४ हजार २०० बार आहेत. ‘सरकारच्या या धोरणांमुळे राज्यातील हॉटेल व्यवसाय बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात वेळोवेळी आम्ही संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला. परंतु शासनाने आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही.’ असे शेट्टी यांनी सांगितले.
प्रीमियम ब्रँड्स महाग झाल्यामुळे ग्राहक कमी गुणवत्तेच्या मद्याकडे वळतील, परिणामी आरोग्याला धोका निर्माण होईल. ग्राहकांची उपस्थिती कमी झाल्यास बार, रेस्टॉरंट्स, पर्यटन क्षेत्राचे उत्पन्न कमी होईल, त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोवा, मध्यप्रदेश, दिव-दमणसारख्या सीमावर्ती भागातून अवैध मद्याचा वापर वाढण्याचा धोका या धोरणांमुळे निर्माण झाला आहे, अशी चिंताही व्यक्त केली.