किरण शिंदे
बारामती : बारामतीत २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. बारामतीच्या महात्मा फुले चौकात एका अपघातात मुलासह दोन नातींचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांचा हा मृत्यू सहन न झाल्याने वडिलांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण बारामती शहरावर शोककळा पसरली आहे.
रविवारी राजेंद्र आचार्य हे १० वर्षीय सई आणि ४ वर्षीय मधुरा या दोन मुलींना घेऊन घरातील सामान आणण्यासाठी दुचाकीवरून बाहेर पडले होते. बारामती शहरातील महात्मा फुले चौकात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला मालवाहू डंपरने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की तिघेही डंपरच्या चाकाखाली चिरडले गेले. ओमकार यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या सई आणि मधुरा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारापूर्वीच त्या दोघांचाही मृत्यू झाला. या भीषण अपघातात तिघांचाही मृत्यू झाल्याने संपूर्ण बारामती शहर हळहळलं होतं. आचार्य कुटुंब मूळचं इंदापूर तालुक्यातल्या सनसर गावचं आहे.
दरम्यान या तिघांच्या मृत्यूचं दुःख कमी होत नाही तोवर आचार्य कुटुंबीयांवर आणखी मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. ओमकार यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचे देखील आज सकाळी निधन झालं. राजेंद्र आचार्य सेवानिवृत्त शिक्षक होते. ७० वर्ष वय असलेल्या राजेंद्र यांना शुगर होती. बारामतीच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. आजारी असलेल्या वडिलांना फळ आणण्यासाठीच ओमकार मुलीसह घराबाहेर पडला होता. आणि दुर्दैवी अपघातात तिघांचाही मृत्यू झाला होता. मुलांच्या आणि नातींच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आज सकाळी राजेंद्र आचार्य यांचे देखील निधन झाले. २४ तासात एकाच कुटुंबातील तिघांचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने आचार्य परिवारासह संपूर्ण बारामतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.