अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात बसपाचा हत्ती सुसाट; बारामतीत अवघ्या २१ वर्षांची तरुणी बनली नगरसेवक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:16 IST2025-12-22T17:14:52+5:302025-12-22T17:16:46+5:30
Baramati Local Body Election Result 2025 अजित पवारांनी बारामती झोपडीमुक्त करण्याचे स्वप्न पहिले आहे. त्याची सुरुवात आमच्या प्रभागातून करा नाहीतर मी सुयोग (अजित पवारांचे निवासस्थान) बाहेर आंदोलन करणार

अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात बसपाचा हत्ती सुसाट; बारामतीत अवघ्या २१ वर्षांची तरुणी बनली नगरसेवक
पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती नगरपरिषदेत अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम ठेवलं आहे. बारामतीत सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत. तर नगराध्यक्षही राष्ट्रवादीचा झाला आहे. अजित पवारांचा बारामती बालेकिल्ल्यात बसपाचा हत्ती सुसाट धावला आहे. अवघ्या एकवीस वर्षांची तरुणी नगरसेवक बनली आहे.
बारामतीतील प्रभाग क्रमांक १४ मधून संघमित्रा काळुराम चौधरी या विजयी झाल्या आहेत. केवळ एकवीस वर्षांची संघमित्रा यांनी आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. काळुराम चौधरी हे बहुजन समाज पक्षाचे राज्याचे महासचिव असून मागील अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी यापूर्वीही नगरपरिषदेसह विधानसभा व लोकसभेचीही निवडणूक लढवली आहे. यांना एकदाही यश मिळालं नव्हतं. पवार कुटुंबाचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेल्या चौधरी यांच्या लेकीने त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले. ते स्वतः या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. मात्र त्यांचा पराभव झाला. OBC नेते लक्ष्मण हाके यांनी या दोघांच्या प्रचारासाठी बारामतीत पदयात्रा काढली होती. सभाही घेतली होती. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने खातं उघडलं आहे. तर दोन अपक्ष उमेदवारांचाही विजय झाला. शरद पवार गटाच्या पक्षानेही खातं उघडलं आहे.
सगळ्या बारामतीकरांचं आभार व्यक्त करतो
मला बारामतीकर आणि माझ्या बहुजन समाज आहे. त्या बहुजन समाजानी जे माझ्या लेकीला आज विजयी केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी प्रथमतः सगळ्या बारामतीकरांचं आणि प्रभाग क्रमांक चौदामधील सर्व मतदारांचा हात जोडून आभार व्यक्त करतो. हा संघर्ष जो संघर्ष आहे हा महात्मा ज्योतिबा फुलेंपासून सुरू झालेला आहे. तेव्हा शाहू महाराज, बाबासाहेब कांशीराम आणि माझ्या लेकीला जे आहे हे बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आकाश आनंद साहेब यांनी दिल्लीवरून बारामतीला पाठवली होती. आकाश टीम बनायला देशात सुरुवात झालेली आहे. SC, ST, OBC सर्व मराठा बांधवांचं देखील माझ्या प्रभागामध्ये होती. मला त्यांनी सहकार्य केलं. त्या सर्वांचे आभार! - काळुराम चौधरी
बहुजन समाज पक्षाच्या नूतन नगरसेवक संघमित्रा चौधरी विजयानंतर म्हणाल्या, मी एकटीच बारामतीच्या विकासासाठी प्रयत्न करत राहील. जिथे विरोध करायचा त्या ठिकाणी विरोध दिसेल. आमच्याकडे महापुरुषांचे विचार आहेत. तेच विचार घेऊन मी पुढे जाईल. अजित पवारांनी बारामती झोपडीमुक्त करण्याचे स्वप्न पहिले आहे. त्याची सुरुवात आमच्या प्रभागातून करा नाहीतर मी सुयोग बाहेर आंदोलन करेल. आम्ही बोलणार नाही तर आम्ही करून दाखवणार असंही त्यांनी सांगितलं आहे.