एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात पैशांची मागणी प्रकरणी चौघांचा जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:48 IST2025-03-11T13:48:26+5:302025-03-11T13:48:57+5:30
परीक्षेपूर्वी एमपीएससी आयोगाबाबत विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला.

एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात पैशांची मागणी प्रकरणी चौघांचा जामीन फेटाळला
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष दाखवून तरुणांकडे ३५ ते ४० लाखांची मागणी करण्यात आली. यामुळे परीक्षेपूर्वी एमपीएससी आयोगाबाबत विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला. आरोपींना जामीन मंजूर झाल्यास ते गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी हजर न राहण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद करीत सहायक सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध केला. तपासातील प्रगती आणि सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. वानखडे यांनी चौघांचा जामीन अर्ज फेटाळला.
दीपक दयाराम गायधने (वय २६, रा. नाणेकरवाडी, चाकण. मूळ रा. तामसवाडी, भंडारा), सुमित कैलाश जाधव (वय २३, रा. रानोबाई मळा, चाकण. मूळ रा. वेहेगाव, नाशिक) योगेश सुरेंद्र वाघमारे (वय २७, रा. सोनुली वरठी, भंडारा), दीपक यशवंत साकरे (वय २७, रा. गाव टेकडी, मध्य प्रदेश) अशी जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी चौघांनी न्यायालयात अर्ज केला. त्यास सहायक सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी विरोध केला. आरोपींनी केलेला युक्तिवाद गंभीर स्वरूपाचा आहे. परीक्षा प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा तसेच आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला आहे. हे आरोपी या गुन्ह्यातील साक्षीदारांवर दबाव आणून गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचे स्वरूप मोठे असून अद्याप तपास सुरू आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.