तिसऱ्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून पडून चिमुरडीचा मृत्यू; कोथरूडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 17:17 IST2020-12-22T17:16:50+5:302020-12-22T17:17:55+5:30
खाली वाकून पाहत असताना अचानक तोल गेल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून ती खाली पडली.

तिसऱ्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून पडून चिमुरडीचा मृत्यू; कोथरूडमधील घटना
पुणे: इमारतीखाली भाजी आणण्यासाठी गेलेल्या आईला खाली वाकून पाहत असताना गॅलरीतून तोल जाऊन तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोथरूडमधील महात्मा सोसायटीत घडली. अविष्का ही आई-वडिलांना एकुलती एक मुलगी होती. तिच्या जाण्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
याप्रकरणी कोथरूडपोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यातत आली आहे. अविष्का विशाळ कोळपकर (वय तीन वर्षे) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील वृंदावन पार्कमधील महात्मा सोयायटीमध्ये तिसऱ्या मजल्यावर कोळपकर कुटुंबीय राहतात. त्यांना तीन वर्षांची मुलगी अविष्का होती. रविवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास अविष्काच्या आईला भाजी आणण्यासाठी खाली जायचे होते. त्यावेळी अविष्का घरात खेळत होती. त्यामुळे त्यांनी तिला घरातच थांबण्यास सांगितले. खाली जाऊन येत असल्याचे सांगितले. त्या घराचा दरवाजा बाहेरून लॉक करून खाली गेल्या. काही वेळानंतर अविष्का आई आली का हे पाहण्यासाठी गॅलरीत गेली. ती गॅलरीतून खाली वाकून पाहत होती. खाली पहात असताना अचानक तिचा तोल गेल्यामुळे ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
....