पुणे शहरातील वाहतुकीचा सरासरी वेग १० टक्क्यांनी वाढला; भविष्यात ताशी ३० किमीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 09:32 IST2025-12-30T09:31:50+5:302025-12-30T09:32:01+5:30
दररोजच्या निरीक्षणातून शहरात ३२ ठिकाणे कायमस्वरूपी वाहतूककोंडीची असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या

पुणे शहरातील वाहतुकीचा सरासरी वेग १० टक्क्यांनी वाढला; भविष्यात ताशी ३० किमीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट
पुणे: शहरातील वाहतुकीचा सरासरी वेग गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्याचे तांत्रिक बाबींवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी हा वेग ताशी १९.५ किमी इतका होता. सध्या हा वेग ताशी २२.५ किमी एवढा झाला असून यामध्ये १०.४४ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. तसेच भविष्यात शहरातील सरासरी वाहतुकीचा वेग ताशी ३० किमीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट पुणे पोलिसांनी ठेवले आहे.
वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या विविध उपाययोजना, रस्त्यांवरील अडथळे कमी करणे तसेच शहरातील मेट्रोच्या विस्तारामुळे वाहतुकीच्या वेगात सकारात्मक बदल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व उपाययोजना अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आल्या आहेत. शहरातील वाहतुकीचा दररोज आणि प्रत्येक मिनिटाचा आढावा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेतला जात असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. यासाठी महापालिकेची एटीएमएस प्रणाली, तसेच गुगल मॅप, मॅपल्स आणि मॅप माय इंडिया या प्रणालींचा वापर केला जातो. शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांवरील वाहतुकीचा वेग, कोंडी आणि प्रवाह याचे सतत विश्लेषण करण्यात येते.
रस्ता रुंदीकरणाद्वारे वहन क्षमतेत वाढ, रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा, सिग्नल सिंक्रोनायझेशन, राँग साइड आणि ट्रिपल सीट वाहनचालकांवर कडक कारवाई, बॉटल नेक ठिकाणी सुधारणा, शहरातील ‘मिसिंग लिंक’ जोडणे, वाहतुकीचे अडथळे हटवणे, चौक व जंक्शन सुधारणा आदी योजना वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी प्रभावी ठरल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
‘लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट’अंतर्गत या उपाययोजना राबवल्या...
१) शहरात २३ ठिकाणी ‘राइट टर्न’ बंद.
२) शहरातील ७ रस्त्यांवर एकेरी वाहतूक.
३) शहरातील ३० चौक-जंक्शनची दुरुस्ती.
४) ९ ठिकाणांचे वाहतुकीला अडथळा ठरणारे रस्त्यातील वाहतूक बेट हटवले.
५) १०१ सिग्नल्सचे सिंक्रोनायझेशन.
६) १९ पीएमपी बस थांब्यांचे स्थलांतर.
७) शहरातील ५ खासगी प्रवासी बस थांबे हलवले.
८) २ मिसिंग लिंक जोडल्या.
९) ६ ठाकाणांचे बॉटल नेक रस्ते रुंद केले.
३२ ठिकाणे कायम वाहतूककोंडीची...
दररोजच्या निरीक्षणातून शहरात ३२ ठिकाणे कायमस्वरूपी वाहतूककोंडीची असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी विशेष उपाययोजना राबवण्याचे नियोजन सुरू असून, टप्प्याटप्प्याने सुधारणा केल्या जाणार आहेत.
वाहतूक शाखेला अतिरिक्त मनुष्यबळ..
वाहतूक शाखेत अतिरिक्त एक हजार पोलिसांचे मनुष्यबळ मंजूर करण्यात आले आहे. वाहतूक शाखेत आणखी एक पोलिस उपायुक्त पद निर्माण करण्यात आले आहे. शहरातील वाहतूक समस्या विचारात घेता वाहतूक शाखेला आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.
वर्षभरात १८ लाख ७२ हजार बेशिस्तांवर कारवाई...
वाहतूक पोलिसांनी वर्षभरात १८ लाख ७२ हजार बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कारवाईचे प्रमाण सात लाख ६८ हजारांनी जास्त आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह प्रत्यक्ष कारवाई करण्यास प्राधान्य देण्यात आले असून, आतापर्यंत ५४ कोटी रुपयांहून जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात राँग साइड वाहने चालवण्याचे प्रमाण मोठे आहे. वर्षभरात राँग साइड वाहन चालवणाऱ्या पाच लाख एक हजार ६६७ वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.