'भारतीय वाद्यांच्या आवाजाचं हॉर्न वाहनांमध्ये बसवणार' या केंद्रीय मंत्र्यांच्या घोषणेवर श्रवणतज्ज्ञांचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 19:41 IST2021-09-17T19:40:59+5:302021-09-17T19:41:07+5:30
पुणे : भारतीय वाद्यांच्या आवाजाचे नवीन हॉर्न वाहनांमध्ये बसविण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणेवर प्रसिद्ध श्रवण तज्ञ ...

'भारतीय वाद्यांच्या आवाजाचं हॉर्न वाहनांमध्ये बसवणार' या केंद्रीय मंत्र्यांच्या घोषणेवर श्रवणतज्ज्ञांचा आक्षेप
पुणे : भारतीय वाद्यांच्या आवाजाचे नवीन हॉर्न वाहनांमध्ये बसविण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणेवर प्रसिद्ध श्रवण तज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी आक्षेप घेतला असून, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात वाहनांच्या हॉर्नच्या आवाजासंबंधी नियमांंमध्ये बदल करणार असल्याची घोषणा केली होती. या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मोटार वाहन उत्पादक कंपन्यांना हॉर्नच्या संगीतमय आवाजाबददल निर्देश देण्यात येणार आहेत. मात्र कुठलेही नवीन धोरण, कल्पना विज्ञानाधारित असावी असं सांगत डॉ. कल्याणी मांडके यांनी अँड असीम सरोदे, अँड अजित
देशपांडे, अँड अक्षय देसाई यांच्यामार्फत संबंधित मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे.
आवाजासंबंधीची ही कल्पना नाविन्यपूर्ण आणि रंजक वाटत असली तरी त्याबददल सर्वकष विचार करण्याची आवश्यकता असल्याचे नोटीशीमध्ये नमूद करण्यात आले आहे. हॉर्न हा रस्त्यावरील इतर वाहने, पायी चालणारी माणसे यांना सावध करण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी असतो. हॉर्नचा आवाज हा ऐकण्याचा संकेत असून, ऐकण्याची कमी-अधिक क्षमता असणा-या सर्वांनाच ऐकू येईल अशा वारंवारितेच्या ध्वनिलहरींमध्ये असतो. तसेच त्याची तीवता देखील विशिष्ट पातळीची असायला हवी. सावधानतेचा इशारा देणारी प्रणाली म्हणून वापरात असलेला हॉर्न जर संगीतमय असेल तर त्याचा माणसाला सावध करण्याचा मुख्य उददेश पूर्ण होणार नाही, असा मुददा नोटीशीमध्ये नमूद करण्यात आला आहे.
आपल्या देशातील रस्त्यावरील वाहने, पादचा-यांची संख्या, रस्त्या क्रॉस करताना आणि वाहतूक कोंडीत होणारा हॉर्नचा वापर या सगळ्याचा विचारकरता अशा परिस्थितीत सतत संगीतमय हॉर्न मोठ्या आवाजात चहू बाजूंनी ऐकू आल्यास गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल असेही नोटीशीमध्ये लक्षात आणून देण्यात आले आहे.