आगीत जळून खाक झालेल्या व जुन्या पीएमपीच्या १०३ बसेसचा लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 20:09 IST2019-02-04T20:07:31+5:302019-02-04T20:09:46+5:30
मागील काही वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बसचा लिलाव होण्याची ही बुहेतक पहिलीच वेळ आहे..

आगीत जळून खाक झालेल्या व जुन्या पीएमपीच्या १०३ बसेसचा लिलाव
पुणे : आगीमध्ये जळून खाक झालेल्या तसेच जुन्या झालेल्या तब्बल १०३ बसचा पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) लिलाव करण्यात आला. या लिलावातून पीएमपीला पावणे दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, या लिलावात पहिल्यांद एका बसला सुमारे दोन ते सव्वा दोन लाख रुपयांची किंमत मिळाली आहे.
ह्यपीएमपीह्णच्या ताफ्यात सध्या सुमारे १५०० बस आहेत. वर्षभरापासून दाखल झालेल्या सुमारे २०० मिडी बस वगळता बहुतेक बस ८ ते १० वर्षांपुढील आहेत. संचालक मंडळाने बसचे आयुष्य निश्चित केले आहे. त्यानुसार १२ वर्ष पुर्ण किंवा ८ लाख ४० हजार किलोमीटरची धाव पुर्ण झाल्यानंतर या बसचे आयुष्य संपते. पण बसची कमतरता असल्याने प्रशासनाकडून आयुष्य संपलेल्या बसही मार्गावर सोडल्या जातात. सुमारे २०० हून अधिक बस १२ वर्षांपुढील आहेत. तसेच अनेक बस क्षमतेपेक्षा अधिक धावत आहेत. त्यामुळे दर महिन्याला किमान एक बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडते. तर काही बस अत्यंत खिळखिळ््या झाल्याने मार्गावर सोडल्या जात नाहीत. अशा बसचा लिलाव करून विक्री केली जाते. त्यानुसार वषार्तून एक-दोन वेळा असा लिलाव होतो.
नवीन वर्षातील पहिला लिलाव मागील आठवड्यात झाला. तब्बल १०३ भंगार बसची या लिलावात विक्री करण्यात आली. मागील काही वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बसचा लिलाव होण्याची ही बुहेतक पहिलीच वेळ आहे. मागील मार्च व मे महिन्यात सुमारे ५० बसचा लिलाव करण्यात आला होता. त्यानंतर हा पहिलाच लिलाव आहे. या लिलावावेळी बहुतेक बसचे इंजिन व गिअर बॉक्स काढण्यात आले होते. यापुर्वी इंजिनासह बसची विक्री होत होती. त्यानंतर एका बसला जवळपास दीड लाख किंवा त्याहून कमी किंमतीत विक्री होत होती. नुकत्याच झालेल्या लिलावात २० बसला सुमारे २ ते सव्वा दोन लाख रुपये किंमत मिळाली आहे. तर इतर बस सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त किंमतीत गेल्या. आतापर्यंतच्या लिलावातील ही सर्वाधिक किंमत मिळाली. या लिलावातून सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा महसुल पीएमपीला मिळाला, असे अधिकाºयांनी सांगितले.
-----------