पीएमपी बसच चोरण्याचा प्रयत्न; पुणे महापालिका भवन परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 09:55 IST2022-10-17T09:54:53+5:302022-10-17T09:55:01+5:30
चोरटे श्रमिक भवनजवळ लावलेली बस चोरून नेण्याचा प्रयत्न करत होते

पीएमपी बसच चोरण्याचा प्रयत्न; पुणे महापालिका भवन परिसरातील घटना
पुणे : महापालिका भवन परिसरात लावण्यात आलेली पीएमपी बस चोरणाऱ्या दोघांना पकडले. त्यावेळी बस केबिनवर आदळल्याने केबिनचे नुकसान झाले. सूरज शशिकांत जडिवे (वय ३५, रा. चिंतामणी पॅरेडाईज, भारतीनगर, कोथरुड), मोहीत अविनाश चव्हाण (वय २६, रा. जनवाडी) अशी अटक चोरट्यांची नावे आहेत. याबाबत जालिंदर खंडाळे (वय २७, रा. पार्वती दर्शन) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खंडाळे पीएमपीत सुरक्षारक्षक आहे. मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास जडिवे आणि चव्हाण महापालिका भवन परिसरात आले. श्रमिक भवनजवळ लावलेली बस चोरट्यांनी सुरू केली. दोघेजण बस घेऊन पसार होण्याच्या तयारीत होते. त्या वेळी खंडाळे आणि सहकारी भीमराव सोनवणे तेथे होते. बस चोरून नेण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना सोनवणे अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बसथांब्याच्या परिसरातील केबिनवर बस आदळल्याने केबिनचे नुकसान झाले. सुरक्षारक्षकांनी दोघांना पकडले. पोलीस उपनिरीक्षक व्ही. के. शिंदे तपास करीत आहेत.